Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीतील धुसफुस चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या आमदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर (Matoshree) बोलावली आहे. ठाकरे विधानसभा निवडणुकीत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असून 288 जागांवर लढण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. त्याचसंदर्भात आमदारांची बैठक बोलावली असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच सर्व आमदारांच्या बैठकीपूर्वी संजय राऊतांच्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आमदारांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिली. तसेच, काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असलं तरी विदर्भातल्या काही जागांवरुन काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. मविआच्या फॉर्म्युल्यानुसार, ठाकरे गटाला विदर्भात 8 जागा मिळाल्या आहेत. मात्र, ठाकरे गट 12 जागांसाठी आग्रही आहे. विदर्भातल्या जागांवरुनच ठाकरे गट महाविकास आघाडीत नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत 288 जागांवर लढण्यासंदर्भात विचारविमर्श आमदारांसोबत केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मविआमध्ये काही अंतर्गत आजार : संजय राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "आम्ही अजिबात नाराज नाही. नाराजी कळवण्याचा प्रश्न येत नाही. आमचा पक्ष स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला आमचे निर्णय पक्षासंदर्भात घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही नाराजी का कळवायची कुणाला? आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. आम्ही बैठका, चर्चांना उपस्थित राहतो. आम्हाला महाविकास आघाडीतून भाजप आणि त्यांच्या बलगबच्च्यांचा पराभव करायचा आहे. मधल्या काळात या सर्व लोकांसोबत टोकाचा संघर्ष आम्ही लोकांनी केला. त्याचे परिणाम आम्ही भोगले. आम्ही तुरुंगात गेलो. आमच्या मुलांवर, आमच्या कुटुंबावर ईडी, सीबीआयचे हल्ले झाले. आमची घरं-दारं जप्त केले, तर आम्ही लढतोय. त्यामुळे भाजपसोबत कसं लढायचं, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही लढू..."
"महाविकास आघाडीची तब्येत नक्कीच चांगली आहे. तब्येतीविषयी शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही. एक्सरे करु आज... एक्सरे एमआरआय करू आज... काही आतले आजार असतात. ते वरुन दिसत नाहीत ना... ते आता आम्ही पाहू...", असंही संजय राऊत म्हणाले.