Solapur Municipal Election 2026: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने (BJP) मोठी खेळी खेळली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

तुषार जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9 ड मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती. 

Solapur Municipal Election 2026: सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या गोटात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदानापूर्वीच घडलेल्या या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आणखी नाट्यमय वळण लागले आहे.

Continues below advertisement

Solapur Municipal Election 2026: सोलापूर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार?

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरीचे सूर स्थानिक आमदारांकडून ऐकू येत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. सकाळी एका पक्षात असलेले नेते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सततच्या राजकीय उलथापालथीत सर्वसामान्य सोलापूरकर मात्र पुरता हैराण झाला आहे. प्रत्येक राजकीय नेता आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त असताना, सोलापूरच्या विकासाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 102 पैकी 49 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर शिवसेनेला 21, काँग्रेसला 11, एमआयएमला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 4, बसपाला 4 आणि माकपला 1 जागा मिळाली होती. आता 2026 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचा फैसला येत्या 16 जानेवारीला होणार आहे.

आणखी वाचा 

Latur Municipal Election 2026: भाजप उमेदवारासाठी पैसेवाटप; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नातेवाईक रंगेहात पकडला, लातूरमध्ये खळबळ