मुंबई : माझे वडील संघाशी जोडलेले होते, त्यामुळे माझे मनही तिकडेच होते. भाजपमध्ये प्रवेश हा काही अचानक झाला नाही, दोन वर्षांपासून त्यावर चर्चा सुरू होती असं शुभा राऊळ (Shubha Raul) म्हणाल्या. उद्धव ठाकरेंबद्दल आपल्या मनात काही नाराजी नाही. आता निवडणूक लढायची नाही तर मला समाजसेवा करायची आहे असंही शुभा राऊळ म्हणाल्या. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शुभआ राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला. माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत कांदिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान शुभा राऊळ यांचा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, शुभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शुभा राऊळ यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.
प्रश्न - ठाकरेंची साथ सोडून भाजप मधे जाण्याचा निर्णय का घेतला?
उत्तर - नाराजी असं काही नाही. काम करण्यासाठी मला स्टेज मिळत आहे. आरोग्य, पर्यावरण या विषयावर काम करायचं आहे. भाजपमध्ये प्रवेश आताच केला असं नाही, मागील दोन वर्षांपासून प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. मला आता निवडणुक लढायची नाही, मला आता केवळ समाजसेवा करायची आहे. माझे वडील संघाशी जोडलेले आहेत. गोवा मुक्ती संग्रामात ते होते. माझ मन तिकडे होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी नाही.
प्रश्न - मुंबईचे प्रथम नागरिक केले, त्यांची साथ सोडली. नेमकं काय झालं?
उत्तर - हिंदुत्व हा बाळासाहेब ठाकरे यांचा श्वास होता. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हे व्हायला नको असं वाटत होतं. गळ्यापर्यंत हा विषय आला होता. परंतु हे घडलं तेव्हापासून मी नाराज होते. त्यावेळी आम्हाला आवाज नव्हता, त्यामुळे काहीच बोलता आलं नाही.
प्रश्न - देवेंद्र फडणवीस हे ठाकरेंवर काहीच कामे केली नाहीत अशी टीका करत होते, त्यावेळी ते थेट तुमच्या महापौरपदाच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित करत होते.
उत्तर - कामे केलीच नाहीत असं अजिबात नाही. हे राजकीय मुद्दे आहेत. एकमेकांवर टीका होणारच. मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ,कोणतीही वाईट वर्तणूक केलेली नाही. कामे केली की नाही हे लोक ठरवतील.
भाजप प्रवेश करण्यापूर्वी ठाकरेंसोबत कोणतंही बोलण झालं नाही. आपली आरोग्य आणि पर्यावरणाची अनेक धोरणं चुकीची आहेत. त्यावर काम करण्यासाठी मी भाजपमध्ये आले आहे.
Shubha Raul Profile : शुभा राऊळ यांचा परिचय
- 2007 ते 2009 दरम्यान मुंबई महापालिकेच्या महापौर.
- सलग तीन वेळा दहिसरमधून नगरसेविका.
- 2014 साली मनसे पक्षातून लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव.
- विधानसभेतील पराभवानंतर शिवसेनेत स्वगृही परतल्या.
- शिवआरोग्य सेनेच्या अध्यक्ष.
- कोरोना काळात आयुष टास्क फोर्सच्या सदस्या.
ही बातमी वाचा: