अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम शिवरायांपुढेच नतमस्तक झाला. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर छिंदमने कार्यालयातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं.


श्रीपाद छिंदमने आपल्या कार्यालयात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. छिंदमने नतमस्तक होत शिवाजी महाराजांचा जयघोषही केला.

शिवरायांविषयी अवमानकारक भाष्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला निवडणुकीतून हद्दपार करण्यात आलं होतं. हद्दपारीचा कालावधी संपल्यानंतर त्याने अहमदनगरमध्ये येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.

अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या श्रीपाद छिंदमने दोन हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. ज्या भाजपमधून त्याची हकालपट्टी झाली, त्याच पक्षाचा उमेदवार प्रदीप परदेशीचा त्याने पराभव केला. त्यामुळे छिंदमने सर्व मतदारांचे आभारही मानले.

माजी उपमहापौर असलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजपमधून बाहेर काढल्यानंतर त्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती.

छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटलं होतं.