अमरावती: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून बुधवारी 65 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.  यामध्ये अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, बडनेरा मतदारसंघात (Badnera Vidhan Sabha Assembly) प्रीती बंड यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच बंड गटाला मोठा धक्का बसला. प्रीती बंड (Priti Band) स्वत: प्रचंड निराश झालेल्या दिसल्या. यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मी पक्षासोबत प्रामाणिक असताना ऐनवेळी मला तिकीट का नाकारण्यात आले, असा सवाल प्रीती बंड यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. 


प्रीती बंड या उद्धव ठाकरे यांचे विश्वासू दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी आपण सुनील खराटे यांना मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. रवी राणा हे बडनेरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आता बडनेरा मतदारसंघात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


प्रीती बंड पुरत्या निराश, हताश स्वरात म्हणाल्या...


ठाकरे गटाच्या उमेदवारी यादीत आपले नाव नसल्याचे समजल्यानंतर प्रीती बंड या प्रचंड निराश झालेल्या दिसल्या. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, या प्रकारामुळे मीच थोडीशी विचारात पडली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मला 75 हजार मतं पडली होती. गेल्या तीन वर्षांपासून मी शिवसेनेसाठी सातत्याने काम करत आहे. मी स्वत: विचारात आहे, हे कसं झालं? पण माझा उद्धव साहेबांवर पूर्ण विश्वास होता, आहे आणि राहील. पण नक्की काय झालं, हे कळायला मार्ग नाही.


मी गेल्या 40-45 वर्षांपासून शिवसेनेसोबत आहे. बंड कुटुंबात निष्ठा आणि प्रामाणिकपणा आहे. पण आमचे कुठे चुकले हे कळत नाही. मी आज काहीच बोलत नाही. पण मी साहेबांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, असे प्रीती बंड यांनी म्हटले.


ठाकरे गट परांड्यातील उमेदवार बदलणार?


ठाकरे गटाने तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघातून रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, आता ठाकरेंचा परांड्यातील उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. परांडा विधानसभेच्या जागेवर मविआकडुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांची दावेदारी आहे. मविआचे सर्व जेष्ठ नेते बैठकीच्या माध्यमातून तिकीट वाटप संदर्भात योग्य तो तोडगा काढत असल्याची माहिती राहुल मोटे यांच्याकडून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमाद्वारे देऊ नका, असे आवाहन मोटे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. परंडा येथील जागा शरद पवार गट की ठाकरे गट लढवणार याबाबत आज अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा


डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल