मुंबई : शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे. दोन्ही आमदारांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात न आल्याने या दोन्ही आमदारांसह समर्थकांनी मातोश्रीबाहेर रात्री ठिय्या मांडला.


आमदार अशोक पाटील यांच्या जागी भांडूपचे विभागप्रमुख आणि विद्यमान नगरसेवक रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तृप्ती सावंत यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाडेश्वर यांना शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी एबी फॉर्म दिला.


दरम्यान पक्षाकडून विद्यमान आमदारांना डावलण्यात आल्याचं लक्षात येताच दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केलं. कार्यकर्त्यांची वाढणारी संख्या पाहता पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेत अधिक कुमक देखील मागवली. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आल्याचं लक्षात येताच कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आलं.


' पक्षाकडून केवळ आश्वासनं देण्यात आली', तृप्ती सावंतांचा आरोप

गेली दोन दिवस मी सतत मातोश्रीवर जात होते. मला पक्षाकडून उमेदवारी का देण्यात यावी याची माहिती देखील मी वरिष्ठांना दिली होती. त्यामुळे मलाचं उमेदवारी मिळणार अशी प्रतिक्रिया आमदार तृप्ती सावंत यांनी एबीपी माझाला दिली होती. जर मला उमेदवारी नाकारली तर तो माझ्यावर अन्याय असेल असे देखील सावंत  बोलताना म्हणाल्या होत्या. अखेर त्यांच्या जागी महापौर महाडेश्वर यांना संधी देण्यात आल्याने सावंत नाराज झाल्या आहेत.


मला उमेदवारी का नाकारली एवढंच साहेबांना विचारायचं आहे

मध्यरात्री आमदार अशोक पाटील स्वतः कार्यकर्त्यांसोबत मातोश्रीबाहेर आंदोलनासाठी बसले होते. यावेळी माझाशी बोलताना पाटील यांनी मला वांद्रे पूर्व मधून पक्षाने उमेदवारी का नाकारली एवढाच प्रश्न साहेबांना विचारायचा आहे, असा पवित्रा अशोक पाटील यांनी घेतला होता.