इस्लामपूर : हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ करताना भर पावसात प्रचारसभा घेतली. धो धो पडणाऱ्या पावसात देखील भाषण न थांबवता माने यांनी सभा गाजवली. यावेळी व्यासपीठावर असलेल्या मंत्री महोदयांसह शिवसेना-भाजपच्या नेत्यांनाही पावसात बसावे लागले. राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे. काल सांगलीच्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारचा शुभारंभ व जाहीर सभेचे वाळवा येथील चौकात आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपा-शिवसेनेचे मतदारसंघातील आणि सांगली जिल्ह्यातील डझनभर नेते उपस्थित होते. या सभेदरम्यान हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने भाषणासाठी उभे राहताच अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे समोर बसलेले कार्यकर्ते उठू लागले. मात्र खासदार माने यांनी कार्यकर्त्यांसह व्यासपीठावरील सर्वांना भर पावसात सभा पार पाडण्यासाठी जागेवरच बसण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भर पावसात सभा सुरु राहिली. भाषण सुरु असताना काही वेळानंतर पावसाचा जोर वाढला. मात्र खासदार माने यांनी पावसातच सभा पार पाडायचा निर्धार पुन्हा बोलून दाखवला. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांची चांगलीच पंचायत झाली. याठिकाणी उपस्थित असलेले मंत्री खोत यांना पाऊस लागू नये म्हणून उपस्थित कार्यकर्त्याने छत्री आणून दिली. मात्र खासदार माने यांनी मंत्री खोत यांना आपण जनतेबरोबर पावसात भिजतच सभा पार पडायची असं पुन्हा आवाहन केले. यानंतर व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांना भर पावसात खासदार माने यांचे भाषण संपेपर्यंत बसून राहावे लागले. खासदार माने यांचे भाषण संपताच मंत्री खोत यांचे भाषण रद्द करण्यात आले आणि त्यानंतर काही क्षणात ही सभा संपवण्यात आली. विधानसभेचा पहिला निकाल कणकवलीतून, संजय राऊतांकडून शिवसेनेच्या बंडखोरीचं समर्थन