...तर युती पुन्हा तोडू, शिवसेना मंत्री रामदास कदमांचा भाजपला इशारा
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2019 04:17 PM (IST)
युती करण्यापूर्वी अडीच-अडीच वर्ष शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं, अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली होती, भाजपने अट मान्य केल्यानंतरच युती झाली, अशी माहिती रामदास कदमांनी दिली. भाजपने अट मान्य केली नाही, तर आम्ही उद्धव ठाकरेंना युती तोडण्यास सांगणार असल्याचंही कदम म्हणाले.
मुंबई : हो-नाही म्हणता म्हणता शिवसेना-भाजपची युतीची सुपारी फुटली. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वीच शिवसेनेने भाजपला घटस्फोटाचा इशारा दिल्याचं समोर आलं आहे. राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याची अट शिवसेनेने ठेवली आहे. तसं न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला आहे. शिवसेना-भाजप युती होऊन दोन दिवस लोटत नाहीत, तोच सत्तेच्या गादीवर पुन्हा आरुढ होण्याचं दिवास्वप्न युतीचे नेते पाहू लागले आहेत. युती करण्यापूर्वी अडीच-अडीच वर्ष शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं, अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली होती, भाजपने अट मान्य केल्यानंतरच युती झाली, अशी माहिती रामदास कदमांनी दिली. VIDEO | अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद न वाटल्यास युती तुटणार? | मुंबई | एबीपी माझा 'मी काल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची मुलाखत पाहिली. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या जास्त जागा येतील, त्यांचा मुख्यमंत्री येईल, असं ते म्हणाले. मात्र हे चुकीचं आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी बातचित करुन वक्तव्य करावं. नाहीतर असं व्हायचं, की युती झाली आणि काहीतरी उलटसुलट बोलल्यामुळे पुन्हा युती तुटायची' असं रामदास कदम म्हणाले. 'भाजपने अट मान्य केली नाही, तर आम्ही उद्धव ठाकरेंना सांगू की युती तोडून टाका' असं रामदास कदम म्हणाले. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर झालेली युती, गेल्यावेळी प्रमाणे निवडणुकांनंतर तुटणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. VIDEO | स्वबळाच्या तलवारी गंजल्या, ढाली झिजल्या का? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा शिवसेना आणि भाजप यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युती करण्याची घोषणा 18 फेब्रुवारीला केली होती. शिवसेना लोकसभेच्या 23, तर भाजप 25 जागा लढवणार आहे. विधानसभेत मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर समसमान जागावाटप करण्याचं ठरलं आहे. जनभावनेचा आदर करत युती करत असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला होता. संबंधित बातम्या :