मुंबई : "उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची सध्याच्या राजकारणाची पद्धत झाली आहे", अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांच्या पक्षांतरावर दिली आहे. सध्याचं राजकारण हे पूर्वीसारखं साधु संतांचं राहिलेलं नसून निष्ठा, विचार याला सध्या फारसं महत्त्व नाही, असंही ते म्हणाले.


राज्यातील विरोधी पक्षाचे अनेक मोठे नेते सध्या पक्ष सोडून शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्रं आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील इतर अनेक नेते देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "भाजपमध्ये येण्यासाठी लागलेली रांग स्वार्थापोटी असल्याचं भाजपच्या नेत्यांनी स्वतः सांगितलं आहे. सध्याचं राजकारण हे पूर्वीसारखं साधू-संतांचं राहिलेलं नाही. निष्ठा, विचार याला सध्या फारसं महत्त्व नाही. गरजेपोटी राजकारणातील तडजोडी होत असतात. स्वतःचं महत्त्व टिकवण्यासाठी हे करावं लागतं. तरीसुद्धा शिवसेनेसारखे पक्ष अजुनही विचार आणि निष्ठेला महत्त्व देतात. शिवसेनेत येणाऱ्या लोकांना पारखून घेतलं जातं. शिवसेनेत यायला तयार असलेल्या प्रत्येकाला पक्षात घेतलं जातं असं नाही".

"उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची सध्याच्या राजकारणाची पद्धत झाली आहे. राजकारणातल्या काही मोजक्या चांगल्या लोकांमुळे अजुनही लोकांचा राजकारणावरचा विश्वास टिकून आहे, असंही राऊत म्हणाले.

ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद तिकडे जास्त लोक
विरोधी पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप-शिवसेनेत कोणतीही स्पर्धा नाही. तसेच शिवसेनेत येणाऱ्यांना कोणतेही आश्वासन आम्ही दिलेले नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसेच ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असतं त्यांच्याकडे जास्त लोकं जातात, असंही ते म्हणाले.