रत्नागिरी  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी विधानसभा निवडणूक,श्रीनिवास वणगा यांचं बेपत्ता होणं आणि विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार या गोष्टींवर भाष्य केलं आहे. निवडणुकीच्या काळात बेपत्ता होऊन श्रीनिवास वणगा यांनी चुकीचा मेसेज देऊ नये, असं रामदास कदम म्हणाले. याशिवाय महायुतीला राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 175 ते 200 जागा मिळतील, असं रामदास कदम म्हणाले. 


श्रीनिवास वणगांच्या भूमिकेवर रामदास कदम काय म्हणाले?


एखादी जागा निवडून येणार नसेल तर त्या ठिकाणचा उमेदवार बदलला जातो. श्रीनिवास वणगा यांनी निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता होऊन चुकीचा संदेश देऊ नये.त्यांनी परत यावं, असं आवाहन रामदास कदम यांनी केलं आहे.  


लोकसभेत आपले अनेक उमेदवार पडले, पण पराभवानंतर देखील त्यांना विधानपरिषद दिली आहे. तुम्हालाही देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.उमेदवारी मिळाली नाही म्हणून हे राक्षस आणि ते (उद्धव ठाकरे) देव म्हणणे चुकीचे असल्याचं रामदास कदम म्हणाले.   


राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार


राज्यात शिवसेनेचे किमान 70 आमदार निवडून येतील आणि महायुतीचे जवळपास 175 ते 200 आमदार निवडून येतील असा मला विश्वास असल्याचं रामदास कदम म्हणाले.  राज्यात पुन्हा आमचेच सरकार येईल, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास देखील रामदास कदम यांनी व्यक्त केला.


मी पक्षाचा स्टार प्रचारकअसून राज्यात किमान चाळीस सभा घेऊन पक्षाला लागेल ती मदत करणार असल्याचं रामदास कदम म्हणाले. स्टार प्रचारक या पदाला न्याय देणार असल्याचं त्यांनी म्हटलं.  उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस मधून आयात उमेदवार उभे करावे लागले असल्याचा टोला देखील कदम यांनी लगावला. 


सुडाच्या भावनेपोटी 40 आमदारांना बदनाम करण्यापेक्षा मुख्यमंत्रिपद का गेले याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करायला हवं होतं. चाळीस आमदारांना बदनाम करण्याची किंमत उद्धव ठाकरेंना मोजावी लागेल, रामदास कदम यांनी म्हटलं.  निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंवर पश्चाताप करण्याची वेळ येईल, असं  रामदास कदम म्हणाले.  


रामदास कदम यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य करणं टाळलं.  लोकं आता नाव नाही तर चिन्ह बघतात. त्यामुळे समान नावाच्या उमेदवारांचा काहीही परिणाम होणार नाही, असं देखील रामदास कदम म्हणाले. ते दापोलीमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.  


इतर बातम्या :


नाशिकच्या नांदगावात नामसाधर्म्याचा रायगड- दिंडोरी पॅटर्न रिटर्न, सेनेचे सुहास कांदे विरुद्ध अपक्ष सुहास कांदे रिंगणात, कुणाचे वांदे होणार?