मुंबई : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं भलतीच कामगिरी बजावल्याचं उघड झालं आहे. शिवसेनेनं घेतलेल्या मतांमुळे मध्य प्रदेशात, राजस्थान, छत्तीसगडमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांमधील भाजपाचे पाच उमेदवार पराभूत झाले आहेत.
शिवसेनेने घेतलेली मते तशी किरकोळ असली तरी भाजपाचं संख्याबळ घटवणारी ठरली आहेत. त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेनेची युती न झाल्यास याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच उचलून धरला आहे. शिवसेनेच्या याच रामनामाचा भाजपाला फटका बसला आहे. शिवसेनेनं मतं घेतल्यानं तीन राज्यांमध्ये भाजपाचे पाच आमदार कमी झाल्यांचं चित्र मतदानाच्या आकडेवारीतून समोर येत आहे.
शिवसेनेनं मिळवलेल्या मतांमुळे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपाच्या पाच उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागाला आहे. तर मध्य प्रदेशात शिवसेनेमुळे गमावलेल्या दोन जागांमुळे भाजप सत्ता स्थापनेपासून दूर गेली. या दोन जागी भाजपने विजय मिळवला असता तर कदाचित भाजपने मध्यप्रदेशात सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले असते.
या मतदार संघात शिवसेनेचा भाजपला फटका
खैरागड, छत्तीसगड : या मतदार संघात भाजपचे उमेदवार कोमल जंघेल अवघ्या 870 मतांनी पराभूत झाले. तर शिवसेनेच्या उमेदवाराला याठिकाणी 1775 मतं मिळाली.
सुवासरा, मध्य प्रदेश : भाजपचे उमेदवार राधेशाम पाटीदार यांचा या ठिकाणी अवघ्या 350 मतांनी पराभव झाला, तर शिवसेनेच्या उमेदवाराला याठिकाणी 360 मतं मिळाली.
नेपानगर, मध्य प्रदेश : या मतदार संघात भाजपचे उमेदवार मंजू राजेंद्र दाद यांचा 1264 मतांनी पराभव झाला. तर शिवसेनेनं 3721 मतं याठिकाणी मिळवली.
मारवार जंक्शन, राजस्थान : भाजपचे उमेदवार केसराम चौधरी यांचा याठिकाणी 201 मतांनी पराभव झाला. तर शिवसेनेच्या उमेदवाराला येथे 1103 मतं मिळाली.
पाचपडरा, राजस्थान : भाजपचे उमेदवार आमरा राम यांचा याठिकाणी 2395 मतांनी पराभव झाला. तर शिवसेनेच्या उमेदवाराला येथे 2698 मतं मिळाली.