सिंधुदुर्ग : राज्यातील महापालिका निवडणुकानंतर (Election) आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकांत भाजपला मोठं यश मिळालं असून मुंबई महापालिकेतही भाजप-शिवसेना युतीने बहुमत मिळवल्याने ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता गेल्याचं दिसून येतं. एकीकडे सत्ताकेंद्र हातातून जात असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते नाराज असल्याचंही पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर असलेल्या शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने रणशिंग फुंकले आहे. मात्र, भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी केवळ आपल्यात तालुक्यात लक्ष देणार असल्याचं सांगितल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी केलेल विधान जिल्ह्यात जोरदार चर्चेत आहे. जिल्ह्यातलं मला माहीत नाही पण, माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समितीमध्ये मी सर्व जागा जिंकेन, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं. त्यामुळे, जिल्ह्यातील निवडणुकांकडे त्यांनी काना डोळा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अनेक दिवसांपासून भास्कर जाधव माध्यमांपासून दूर आहेत, राज्यातील राजकीय परिस्थितीवरही ते भाष्य करण्याचे टाळत आहेत. त्यातच, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भास्कर जाधव यांचा केवळ त्यांच्या मतदार संघावर फोकस पाहायला मिळत आहे. 

पत्रकारांनी जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न केल्यानंतर भास्कर जाधवांनी अजब उत्तर दिलं. मला जिल्ह्याचे माहित नाही, पण माझ्या मतदार संघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार, असे जाधव यांनी म्हटलं. शिवसेना ठाकरे पक्षातील वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या भास्कर जाधव यांनी आपला संपूर्ण फोकस केवळ मतदारसंघातील निवडणुकांवर ठेवल्याने ते पक्षात नाराज आहेत का, अशी देखील चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

भाजप ज्यांच्याशी मैत्री करते, आधी त्यांना संपवते

भाजपकडून आतापर्यंत पक्ष फोडून झाले, आता भरमसाठ पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा फंडा सुरू झालाय. आमच्याकडे पैसे नाहीत मात्र प्रचंड जनशक्ती आहे. धनशक्तीसमोर जनशक्ती भारी पडेल असा मला विश्वास आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपवर टीका केली. तसेच, भाजप ज्यांच्याशी मैत्री करते आधी त्यांना संपवते, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जीव चोचीत अडकला आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

गेलेल्यांना भावनिक साद

गुहागर मधील 15 उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मला उभं राहायला अजून चार वर्षे शिल्लक आहेत, मी यांना ऐकणार नाही. गेली ती गंगा आणि राहिले ते तीर्थ, जे सोडून गेलेत त्यांनी पुन्हा माघारी या. आपण विकासाचा नवा हुंकार देऊ, असे म्हणत गुहागरमधील सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना भास्कर जाधव यांची भावनिक साद घातली. 

हेही वाचा

कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू