Shirur, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना 53949 मतांची आघाडी मिळाली आहे. अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जातोय. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. हे माझ्या एकट्याचं यश नाही, सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.


लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसा निवडून येतो बघतोच, असा सज्जड दम अजित पवारांनी दिला होता. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्विकारलं होतं. आता लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते. अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांना जशाच तसं उत्तर देत हे चॅलेंज स्विकारलं होतं. 


मोठी आघाडी मिळाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी एबीपी माझासोबत बातचीत केली. त्यावेळी बोलताना हा माझा विजय नाही, हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. अमोल कोल्हे म्हणाले की, अजित पवारांसाऱ्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व शिलेदारांनी ज्या हिरहिरीने किल्ला लढवला, त्या प्रत्येकाचा हा विजय आहे. त्याचं कौतुक आहे. पराभव कुणाचा यापेक्षा निष्ठा, प्रमाणिकपणा आणि स्वाभिमान यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय आहे. 



शरद पवार यांच्याविषयी आदर वाढला - 


स्वत: लोकसभा निवडणूक लढवत असताना सहा सहा मतदारसंघात जाऊन सभा करणं, थोडं रिस्की असल्याचं अनेक नेत्यानं सांगितलं होतं. पण माझा प्रमाणिक हेतू होता. कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांनी संघर्ष उभा करत होते. त्यामध्ये माझा खारीचा वाटा व्हावा म्हणून मदत करत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची कामगिरी पाहून उर अभिमानाने भरुन येतो. शरद पवार यांच्याविषयी आदर आणखी वाढलाय. सगळं काही गमावलं असं वाटत असताना शरद पवार ज्या हिमतीने उभे राहिले, हे संघर्षाचं मोठं उदाहरण आहे. हे सर्व महाराष्ट्राला प्रेरणा देणारं आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.