Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024  : विधानसभेत संख्या बळ नसतानाही विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव झाला. राष्ट्रवादीने शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. पण त्यांना अपेक्षीत मतं मिळाली नाहीत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चुरशीचा सामना होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये सदाभाऊ खोत यांनी बाजी मारली.  

जयंत पाटालांनी मतमोजणी केंद्र सोडलं - 

शेकपचे जयंत पाटल यांना पहिल्या टप्प्यात दुहेरी संख्याही गाठता आली नाही. पहिल्या पसंतीमध्ये शेकपच्या जयंत पाटील यांना फक्त 8 मतं मिळाली होती. विजयासाठी 23 संख्या गाठावी लागते.  शेकपच्या जयंत पाटलांना हा टप्पा पार पाडता येईल का? असा सवाल उपस्तित झाला. पण पहिल्या टप्प्यातच पिछेहाट दिसल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडले.  

महायुतीचा जल्लोष -

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. दोन्ही गटांकडून आमचे सर्व उमेदवार निवडून येणार, असा दावा केला जात होता. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार होता, मात्र तो नेमका कोणाचा हे निकालानंतरच स्पष्ट झाले. विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. दुसरीकडे महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय झालाय. भाजपच्या पाचही उमेदवारांनी विजयी मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे दोन उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.  तर एकनाथ शिंदेंचे दोन्ही उमेदवार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांचाही विजय झाला आहे. सर्व 9 आमदारांचा विजय निश्चित झाल्यानंतर महायुतीच्या आमदारांनी जल्लोष केलाय.  

कोणते उमेदवार विजयी? 

भाजपचे विजयी उमदेवार

1) योगेश टिळेकर - 26 मते2) पंकजा मुंडे - 26 मते3) परिणय फुके- 26 मते4) अमित गोरखे - 26 मते5) सदाभाऊ खोत - 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार1) भावना गवळी - 2) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

1. शिवाजीराव गर्जे2. राजेश विटेकर

काँग्रेस विजयी उमेदवार1) प्रज्ञा सातव - 26

शिवसेना ठाकरे गट 1) मिलिंद नार्वेकर

काँग्रेसची आठ मतं फुटली - 

दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा दिसून आला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची आठ मते फुटल्याचं समोर आलेय. त्यामुळे लोकसभेला दमदार यश मिळालेल्या काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.  दुसरीकडे ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेतील एकही मतं फोडता आले नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही अजितदादाच्या राष्ट्रवादीचं मत फोडता आले नाही. महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. 9 जागांवर महायुतीचा विजय झाला.