शिरुर : पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याचं क्रेडिट भाजप घेऊ लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दहशतवादी अड्डे माझ्या सल्ल्यानंतरच उध्वस्त केले असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे.




शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर चाकणमध्ये हा गौप्यस्फोट पवारांनी केला. पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत देशातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. मी माजी संरक्षण मंत्री असल्यानं तिथं मला आता काय करायचं? असा पहिला प्रश्न विचारला गेला. त्यावर मी देशाच्या तिन्ही दलांना फ्री हँड देत, दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश द्या, असा सल्ला दिला. माझ्या या सल्ल्याला सर्व प्रमुख नेत्यांनी होकार दिला, असे पवारांनी सांगितले.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला जोरदार तडाखा
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला होता. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले होते. या एअर स्ट्राईकने भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला होता. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.  या कारवाईत भारताने आपल्या मिराज-2000 या विमानांचा वापर केला होता.

भारतीय वायुसेनेने केंद्र सरकारकडे पुरावे म्हणून 12 छायाचित्रे आणि अहवाल सुपूर्द केला : सूत्र
बालाकोट येथील एअर स्ट्राईकबाबत पुरावे म्हणून भारतीय वायुसेनेने केंद्र सरकारला रडार आणि उपग्रहांद्वारे घेतलेली छायाचित्रे दिली आहेत. संरक्षण विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फोटोंमध्ये बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण केंद्र उध्वस्त झाले असल्याचे पुरावे आहेत.

छायाचित्रांसह वायुसेने सरकारकडे या हल्ल्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, वायु सेनेने बंकर बस्टिंग मिसाईल्सचा वापर केला होता. या हल्ल्यात पूर्ण इमारत उद्ध्वस्त होईलच असं सांगता येणार नाही. परंतु भारताने संपूर्ण क्षमतेनिशी हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. त्यातच आता वायु सेनेने केंद्र सरकारकडे पुरावे सादर केले असल्याची माहिती मिळाली आहे. आता हे पुरावे सरकार लोकांसमोर कधी मांडणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दरम्यान, भारताने ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, तिथल्या इमारती जशाच्या तशा आहेत, असा दावा काही आंतराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे. त्यामुळे सरकार आणि आंतरराष्ट्रीय मीडिया या दोघांनी दोन वेगवेगळे दावे केल्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे.

संबंधित बातम्या

भारताचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला, जैशचे अड्डे उध्वस्त  

भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता

पुलवामाचा बदला : पाकिस्तान घाबरला, पाक सरकारने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली 

'मिराज' ने पाकिस्तानला हादरवले, याआधीही पाकला पाणी पाजले होते, काय आहे मिराज -2000 विमान