सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अख्ख्या जगाला अभिमान आहे. गादीचा अभिमान आहे. पुरंदर किल्ल्याचा तह झाला. त्यावेळी मिर्झाराजे आले पण छत्रपतींनी किल्ले सोडले नाहीत. छत्रपतींना दिल्लीत चुकीची वागणूक दिली गेली. आपल्या स्वाभिमानाकरीता महाराज तिथून उठून गेले. दिल्लीत स्वाभिमानाला धक्का पोहोचला म्हणून महाराजांनी सहन केले नाही मात्र आज? असा प्रश्न करत उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला.


या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा. आता शौर्याचे प्रतीक असलेल्या आपल्या महाराजांच्या किल्ल्यात छमछम होणार आहे हे काय चालले आहे असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला.

आजच्या काळात ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाही. जे काळ्या आईशी इमान राखतात त्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे पवार म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर भारतावर पाकिस्तान, बांग्लादेश, चीनकडून हल्ले झाले मात्र या भागातील जन्मलेल्या जवानांनी ते हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते यशवंतराव चव्हाण याच मातीतले त्यामुळे मला माहिती आहे हा जिल्हा विचारांशी प्रतारणा करणार नाही आणि जो करेल त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज ती परिस्थिती जन्माला आली आहे ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्त बसायचे नाही असे आवाहनही पवार यांनी केले.

मला सातारकरांना अंतःकरणातून धन्यवाद द्यायचे आहे. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी मोठ्या जल्लोषात माझे स्वागत केले. सातारा जिल्ह्याने नेहमीच देशाच्या हितासाठी काम केले. सातारला स्वातंत्र्य लढ्याचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी इथे प्राणाची आहुती दिली आहे असेही  पवार म्हणाले.

आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. त्यांनी मुलांना शिकवले एक पिढी घडवली मात्र आज काय परिस्थिती आहे. मुलं शिकली आहेत मात्र मुलांना रोजगार नाही. मुलांना पाहुणे बघायला येतात मात्र नोकरीच नसल्याने माघारी परततात हे तरुणांचे दु:ख शरद पवार यांनी सांगितले.