Sharad Pawar on Hasan Mushrif, गडहिंग्लज : "लोकांनी निवडून दिलेल्याची बांधिलकी न जपता तुम्ही खुशाल निघून गेला. कशात तरी हात गुंतले असतील बरबटलेले असतील तरच अशी भीती वाटते. ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपने बाजूला ठेवले आहेत. लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले. काही लोक मोठ्या तोंडाने सांगत आहेत मी पवारांना सांगून गेलो. आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा हा प्रकार आहे. हसन मुश्रीफ यांना पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे...", असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार हल्ला केलाय. ते गडहिंग्लज मधील सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, काही लोक वेगळ्या रस्त्यावर गेले, दुर्दैवाने तुमच्या जिल्ह्यातील लोकही त्यामध्ये आहेत. हा जिल्हा, हा परिसर ऐतिहासिक आहे. शाहू महाराजांचा विचार हा स्वीकारलेला परिसर आहे. हातामध्ये असलेली सत्ता लोकांसाठी वापरायची असते. सत्ता वापरत असताना जात-पात असा विचार करायचा नसतो. आपल्याला वाटतं शाहू, फुले आणि आंबडेकरांचं नाव आपल्या महाराष्ट्रापुरते सीमित आहे, पण तसं नाही. मी बिहारमध्ये जातो, तिथे नाव घेतलं जातं. इतर राज्यांमध्ये देखील त्यांचं नाव घेतलं जातं.
हे राज्य वेगळ्या रस्त्यावर नेले पाहिजे. आम्ही विचार केला, समाजातील लहान घटक असतील, अल्पसंख्यांक असतील, त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्याच दृष्टीने कोल्हापुरात अनेकांची नावं पुढे आली. त्यामध्ये हसन मुश्रीफांचे नाव देखील पुढे आले. आम्ही म्हणालो, लहान समाजातील घटक आहे, काम करण्याची तयारी आहे. त्यांना शक्ती दिली. मी तुमच्या भागात आलो, जाहीर सभा घेतल्या. तुम्ही लोकांनी साथ दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना जाता आलं. आमचं महाराष्ट्राच्या विधानसभेत संख्याबळ वाढलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आमचे काही सोडून गेले, कुठे गेले माहिती नाही. एकदा भेटायला आले, मला म्हणाले, आम्ही वेगळा विचार करतोय. तुम्ही आमच्या बरोबर चला. मी म्हणालो आपण भाजप विरोधात मतं मागितली त्यांच्या विरोधात जायचं म्हणत आहात. मी म्हणालो हे माझ्याकडून शक्य नाही. या गोष्टीला आम्ही कदापी पाठिंबा देणार नाहीत. काही लोकांनी हळूच कानात सांगितलं, निर्णय घेतला नाही तर आम्हाला आत जावं लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाचायला मिळालं. त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली. त्यांच्या घरातील एका भगिनीने सांगितलं, अशा प्रकारची हीन वागणूक मिळणार असेल तर आम्हाला गोळ्या घाला. हे सगळं घडू नये यासाठी या लोकांनी केला. यामध्ये किती सत्यता आहे, हे छगन भुजबळांनी सांगितलं असतं.
शरद पवार म्हणाले, आज तरुण पिढीमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थ उद्या सामाजिक ऐक्याला धक्का देण्याची शक्यता आहे. हे घालवायचं असेल तर मुलांना काम दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय देखील हातात घ्यावा लागेल. हे कार्यक्रम राबवायचे असेल तर सत्ता असायला हवी. परिवर्तन करण्याची महाराष्ट्रात गरज आहे. उद्या मतदान करण्यासाठी जाल तेव्हा समरजीत यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या