सोलापूर: गेल्या काही तासांमध्ये अनेक राजकीय ट्विस्ट आल्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचा उमेदवार अखेर ठरला आहे. शरद पवार गटाने यापूर्वी मोहोळमधून माजी आमदार सिद्धी रमेश कदम (Siddhi Kadam) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मोहोळमधील शरद पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. मोहोळ विधानसभेतील (Mohol Vidhan Sabah) पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सिद्धी कदम यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर मोहोळ विधानसभेतील शरद पवार गटाचा नवा चेहरा कोण असणार, याची चर्चा रंगली होती. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. राजू खरे हे शरद पवार गटाचे मोहोळमधील नवे उमेदवार असतील.
विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजू खरे यांना शरद पवार गटाकडून तात्काळ एबी फॉर्म देण्यात आला.पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलेली असताना आता शरद पवार गटाने अनिल सावंत यांना दिला एबी फॉर्म दिला होता. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे भगीरथ भालके आणि राजू खरे या दोघांना एबी फॉर्म दिला. दरम्यान, सिद्धी कदम यांनी उमेदवारी रद्द झाल्यानंतर रमेश कदम हे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. यावेळी ते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शरद पवार यांनी स्वत: सिद्धी कदम यांची उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी शरद पवार यांनी सिद्धी कदम कशाप्रकारे उच्चशिक्षित चेहरा आहे, हे सांगितले होते. सिद्धी कदम यांनी त्यांचे वडील रमेश कदम तुरुंगात असताना 2019 साली त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. शरद पवार यांनी अवघ्या 26 वर्षांच्या सिद्धी कदम यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. ही उमेदवारी रद्द करताना कोणतेही कारण देण्यात आले नव्हते.
जयंत पाटलांचं तातडीने निवडणूक आयोगाला पत्र
शरद पवार आणि मोहोळमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सिद्धी कदम यांनी सोमवारीच शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, सिद्धी रमेश कदम यांच्या नावाने अनावधनाने ए बी फॉर्म वितरीत करण्यात आलेला आहे. तरी सदरचा फॉर्म रद्द करण्यात यावा आणि राजू खरे यांचा ए बी फॉर्म ग्राह्य धरण्यात यावा, असे जयंत पाटील यांच्या पत्रात म्हटले आहे.
आणखी वाचा