गांधी घराण्याला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही काय दिवे लावले सांगा? पवारांचा मोदींवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2019 08:03 AM (IST)
गांधी घराण्याची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही. मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केलं? पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा, अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींना जाब विचारला.
उल्हासनगर : ज्या घरात दोन हत्या होऊनही पुढची पिढी जबाबदारी झटकत नाही, त्या गांधी घराण्याला तुम्ही काय केलं म्हणून विचारता? पण तुम्ही काय दिवे ते पहिल्यांदा सांगा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. उल्हासनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत पवारांनी टीकास्त्र सोडलं. 'राजीव गांधी यांनी देशाला विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे नेलं. त्यामुळेच आज खेड्यापाड्यात महिलांच्या हातात मोबाईल दिसतो. गांधींच्या घरात इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी राजीव गांधी समोर आले. राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळी सोनिया गांधी पुढे आल्या. आता राहुल गांधींनी जबाबदारी घेतली आहे. गांधी घराण्याची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही. मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केलं? पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा. उगाचच इतरांवर आरोप करु नका' अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींना जाब विचारला. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. नरेंद्र मोदींएवढी व्यक्तिगत टीका कुणी केली नाही, अशी खंत शरद पवारांनी 'विचारसंहिता' या विशेष कार्यक्रमात 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली होती.