अहमदनगर  : 13  वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत अशा शब्दात शरद पवार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर श्रीगोंदा येथील सभेत टीका केली.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज शरद पवार यांनी श्रीगोंदा येथे घेतली. यावेळी शरद पवार बोलत होते.


यावेळी पवार म्हणाले की, नाचता येईना अंगण वाकडे अशी यांची स्थिती आहे. 13 वर्ष मंत्री पदाची संधी दिली काय कमी गोष्ट आहे का? असा सवालही पवार यांनी केला. अनेकांना मी महाराष्ट्रात मोठं करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बबनराव पाचपुते यांनी भाषणात '13 वर्ष मंत्री केले परंतु फक्त सहीचा अधिकार होता' असं म्हटलं होतं. परंतु मंत्र्यांनी सही केली की आदेश होतो. मंत्र्यांनी सही केली की कुठल्याही कामाला मंजुरी मिळते. त्यामुळे सहीचा अधिकार खूप मोठा आहे. सहीचा अधिकार 13 वर्ष होता आणि काहीच करता आलं नाही असं म्हणतात आता काय बोलणार यांना, असे पवार म्हणाले.

यांना गृह खात्याचा राज्यमंत्री केलं. जाईल तिथे पोलिसांचा सॅल्युट मिळायचा. मंत्रिमंडळात वन खातं हे महत्वाचं खातं असतं. मी स्वतः वनमंत्री होतो. मुख्यमंत्री असताना गृह खाते कमी करुन वनखातं घेतलं. महाराष्ट्रात वनसंपत्ती वाढवल्याशिवाय पावसाचा, पाण्याचा आणि बाकीचा जो प्रश्न आहे तो सुटणार नाही. म्हणून मी स्वतः ते काम केले आहे असेही पवार म्हणाले.

कारखाने कितीही काढा परंतु इथल्या कामगाराचे पैसे आणि शेतकर्‍यांचं देणं द्या. ज्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांनी आपला ऊस घालून वर्ष दोन वर्ष पैसे थकवले तर ती गोष्ट योग्य नाही. त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मेहनत करुन घाम गाळलेली पगाराची रक्कम त्याला मिळत नसेल. तर त्याची चुलही पेटत नाही. जो माणूस कष्ट करणार्‍या कामगाराची चुल न पेटवण्याचे काम जो माणूस करतो त्याला गरिबांचा तळतळाट लागतो आणि हा तळतळाट असला की त्याला यश घेता येत नाही अशी टीकाही पवार यांनी केली.