छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीय. या गाडीत संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे होते. त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. मतदानाला अवघा काहीच वेळ राहिला असताना ही घटना घडली आहे.


सिद्धांत शिरसाट हे घरी जात असताना हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हा हल्ला गाडीच्या मागून झाल्याचं दिसतंय. या हल्ल्यात सिद्धांत शिरसाट मात्र सुखरूप आहेत. या प्रकरणी संजय शिरसाट आता कुणाला लक्ष्य करतात हे पाहावं लागेल. 


मतांसाठी पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ शेअर


गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांमुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात एका मतासाठी मतदाराला विशिष्ट रकमेचं वाटप करण्यात येत असल्याचा व्हिडीओ दानवे यांनी एक्सवर पोस्ट केला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मतासाठी आधी एक हजार रुपये देऊन आधार आणि मतदान कार्डस जमा करून घेण्यात येत होती. मतदानाच्या दिवशी त्यांना बोटाला शाई लावून मतदान कार्ड आणि पाचशे रुपये घेऊन जायचे असा प्रकार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जवाहरनगर पोलीस स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी संबंधित एका व्यक्तीकडून देवळाई तांडा येथे हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.


संजय शिरसाटांनी आरोप फेटाळले


पराभव जवळ दिसू लागल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करत आहेत असं सांगत संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले आहेत. 


संजय शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीला


कालीचरण महाराजांनी मनोज जरांगेंना शिवीगाळ केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय शिरसाट हे मनोज जरांगेंच्या भेटीला गेले. कालीचरण महाराजांचा आणि आपला काही संंबंध नाही असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मतदानाच्या आधी ही भेट महत्त्वाची मानले जाते. 


ही बातमी वाचा: