मुंबई : महाराष्ट्रात आज 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. विविध ठिकाणांहून आचारसंहिता भंगाच्या घटना समोर येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह लावलेलं होतं, यावरुन संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आहेत. तर, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी देखील रवींद्र चव्हाण यांच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह मतदानावेळी असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यावरुन रवींद्र चव्हाण यांच्या कृतीवरुन संजय रऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, "निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे! यांच्यावर काय कारवाई होणार? मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात, काढा याना ठेचून. 

संजय राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवरील चिन्हाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला आहे. यामध्ये त्यांनी एका बाजूला निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय, असा सवाल केला. तर, आचारसंहिता भंग करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्यावर कारवाई केली जाणार असाही सवाल संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठेचून काढण्याची भाषा करतात, त्यांना ठेचून काढणार का असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला. 

Continues below advertisement

राज्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले? 

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना संजय राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात केलेल्या पोस्टबाबत विचारण्यात आलं. यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी चौकशी करुन कारवाई करु, असं म्हटलं आहे. 

दरम्यान,  मतदान प्रक्रियेतील गोंधळावरुन संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत 29 टक्के मतदान झालं आहे.

संजय राऊत यांची पोस्ट