नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये फडकवलेल्या धर्मध्वजावर झाडांचे चिन्ह आहे, पण नाशिकमध्ये मात्र भाजपने तपोवनात (Nashik Tapovan) दोन हजार झाडांची कत्तल केली. हे कंत्राट ज्या ठेकेदाराला देण्यात आलं तो भाजपच्या निवडणुकीचा सगळा खर्च बघणार असल्याची माहिती आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकमध्ये (Nashik Kumbh Mela) 50 हजार कोटींची कामं होणार आहेत, त्यासाठी सगळी कंत्राटं मात्र गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली, त्यावेळी संजय राऊत बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिक निवडलं, त्यावरून ठाकरेंचं नाशिकवर किती प्रेम आहे हे लक्षात येईल. भ्रष्टाचाराची वाळवी लागलेल्या नाशिकची सत्ता ठाकरे बंधूंच्या हाती द्या, भ्रष्टाचारी लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut Nashik Speech : गुजरातच्या ठेकेदाराला नाशिकमधील कंत्राटं
संजय राऊत म्हणाले की, "कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये 50 हजार कोटीची कामं निघाली असून ती गुजरातच्या ठेकेदारांना मिळाली आहेत. त्याची यादी सर्वांसमोर आहेत. कुंभच्या निमित्ताने तपोवनामध्ये दोन हजार झाडांच्या कत्तली करण्यात आल्या. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येवरती धर्मध्वज फडकावला त्या धर्मध्वजावर झाडांचे चिन्ह आहे. पण भाजपने तपोवनातील दोन हजार झाडे तोडली. ते काम ज्या बिल्डरला देण्यात आलं. तो बिल्डर भाजपच्या सर्व उमेदवारांचा खर्च करणार असल्याची माहिती आहे."
नाशिकमध्ये भ्रष्टाचार बोकाळला, भाजपने फक्त विकासाच्या गप्पा मारल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, "नाशिकला हे स्मार्ट सिटी करणार होते. देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतलं. पण सावत्र भावापेक्षा वाईट अवस्था त्यांनी या नाशिकची केली.
आज नाशिकमध्ये सर्वात जास्त प्रमाणात अमली पदार्थ येत आहेत. पान टपरीपासून शाळेच्या मुलांपर्यंत हे अमली पदार्थ सहजपणे पोहोचतात. नाशिकमध्ये सुरू असलेल्या या अवैध गोष्टी बंद करायच्या असतील तर ठाकरे बंधूंच्या हाती सत्ता द्या. नाशिमध्ये ज्यांनी महापालिका लुटली, ज्यांनी भ्रष्टाचाराची वाळवी लावली त्यांना धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
Raj Thackeray Nashik Speech : राज ठाकरेंची भाजपवर टीका
राज ठाकरेंनीही तपोवनातील झाडांच्या कत्तलीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, "भाजप तपोवनातील झाडं छाटायच्या आधी पक्षातील लोकं, कार्यकर्ते छाटली आणि आता बाहेरून लोक आणली जातात. 2012 साली आमची सत्ता असताना त्यावेळी कुंभमेळा झाला. त्याचं नियोजन उत्तम करण्यात आलं. त्यासाठी एकही झाड कापलं नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा सत्कार झाला. मग आता काय झालं? कुंभमेळ्याच्या नावाखाली आता झाडं तोडायची, नंतर साधू परत गेल्यानंतर ती जागा उद्योगतपींच्या घशात घालायची. भाजपचं हे सगळं आधीच ठरलेलं असतं."
ही बातमी वाचा: