मुंबई : राज ठाकरेंच्या सभांविषयी प्रश्न विचारल्यावर काँग्रेसचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवार असलेले संजय निरुपम यांनी मला इरिटेट करु नका, असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना निरुपम यांना मनसेविषयी प्रश्न केल्यावर त्यांनी अशी उत्तरं दिली.




निरुपम यांना मनसेच्या सभांविषयी विचारले असता मनसेची रेकॉर्डिंग चालवू नका, माझा जीव राहू द्या ना, असं म्हटलं आहे. यावेळी निरुपम म्हणाले की, कोण कुठे सभा घेईल ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझी मनसेबद्दल काही नाराजी नाही, त्यांच्या सभांना विरोध नाही.

मनसैनिकांचा सहयोग मिळत नसल्याच्या चर्चेवर निरुपम यांना विचारले असता ते म्हणाले की, तो विषय आमचा नाही. मनसेच्या विषयावर मी आता जास्त बोलत नाही. कोणाचा विरोध नाही, निषेध नाही. सध्या मी स्वत:ला प्रचारात झोकून दिलंय, असं ते म्हणाले.

राज ठाकरेंनी तुमच्या मतदारसंघात सभा घ्यावी का? असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की.  कोण कुठे सभा घेईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जे लोक मोदी सरकारला पाडायचा संकल्प करतायेत त्यांनी आघाडीला सहयोग दिला पाहिजे, असं निरुपम म्हणाले.

यावेळी निरुपम म्हणाले की, गजानन किर्तीकर म्हणजे नॉन पफॉर्मिंग अॅसेट आहेत. ते आता काहीही करु शकत नाहीत. किर्तीकरांना शिवसैनिकांचाच विरोध आहे. त्यांना शिवसैनिकच पाडणार असेही निरुपम म्हणाले.