Babasaheb Deshmukh Sangola Vidhansabha : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) यावेळी सांगोला विधानसभा (Sangola Vidhansabha) मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. कारण या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार शहाजीबापू पाटील निवडणूक लढवत होते. तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून दीपकआबा साळुंखे पाटील तर शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, यामध्ये अखेर शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी (Babasaheb Deshmuk) मैदान मारलं आहे. आमदार होताच बाबासाहेब देशमुखांनी मोठ्या आणि स्तुत्य उपक्रमाची घोषणा केली आहे.
बाबासाहेब देशमुखांच्या उपक्रमाचे कौतुक
बाबासाहेब देशमुख यांनी विजयी होताच, ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी त्यांनी हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. बाबासाहेब देशमुख यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये ते विजयी झाले आहेत.
गड पुन्हा केला काबीज
सांगोला हा शेकापचा गड आहे. तब्बल 11 वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व दिवंगत गणपतराव देशमुख यांनी केलं होतं. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा हा गड ढासळला होता. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेकापनं आपला सांगोल्याचा गड काबीज केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांना तब्बल 25 हजार 386 मतांनी चितपट करत विजय मिळविला आहे. बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचे उठ्ठे काढले आहे. सांगोला विधानभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांना (शेकाप) 1 लाख 16 हजार 256, तर त्यांचे विरोधक ॲड. शहाजीबापू पाटील (शिवसेना शिंदे गट) यांना 90 हजार 870 मते पडली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना 50 हजार 962 मते मिळाली आहेत.
अटीतटीच्या लढतीत बाबासाहेब देशमुखांनी लाल बावटा फडकवला
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या काही लढतींपैकी सांगोला विधानसभा मतदारसंघाची एक लढत होती. अत्यंत अटीतटीची ही लढत मानली जात होती. मात्र, अखेर बाबासाहेब देशमुखांनी या मतदारसंघात बाजी मारली आहे. महाविकास आघाडीकडून सांगोल्याची जागा शेकाप पक्षाला सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना ठाकेर गटाला सुटली. त्यामुळं बाबासाहेब देशमुख यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सांगोल्यात आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं होते. याचा फायदा शहाजीबापू पाटील यांना होणार का? असी देखील मतदारसंघात चर्चा होती. मात्र अखेर बाबासाहेब देशमुखांनी विजय मिळवत शेकापचा लाल बावटा फडकवला आहे.
महत्वाच्या बातम्या: