उल्हासनगर : पप्पू कलानी हे दहशतवादी असून अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या प्रवक्त्याने केलंय. या वक्तव्यामुळे उल्हासनगरमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये शनिवारी भाजपच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाजपचे प्रवक्ते राम वाधवा यांनी विकीपीडियाचे हवाले देत उल्हासनगरचं नाव गुन्हेगारीसाठी बदनाम झाल्याचा सांगितलं. तसंच पप्पू कलानी हे दहशतवादी असून अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं.


यावरून उल्हासनगर शहरात वातावरण चांगलंच तापलं. कलानी समर्थकांनी भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या घरावर मोर्चा काढत त्यांच्याविरोधात खालच्या पातळीची घोषणाबाजी केली. या सगळ्याला आम्ही कलानी स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा या यानंतर पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी दिला आहे. तर राम वाधवा यांनी यानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे.


आमदार ज्योती पप्पू कलानी यांनी याप्रकरणी पोलीस कारवाईची मागणी केली असून कारवाई न झाल्यास परिस्थिती बिघडेल, असा थेट इशारा दिला आहे. तर खुद्द भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनीही अशाप्रकारे राजकीय मंचावरून वैयक्तिक टीका टिप्पणी करणं योग्य नसल्याचं सांगत वाधवा यांचे कान टोचले आहेत. आधी गुन्हेगारी विश्वाशी संबंध असलेले पप्पू कलानी हे नंतर राजकारणात आले आणि उल्हासनगर शहराचे सलग चार वेळा आमदार झाले.


सध्या एका हत्याप्रकरणात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्यांच्या पत्नी ज्योती कलानी या उल्हासनगरच्या आमदार आहेत. उल्हासनगरात कलानी यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे उल्हासनगरमध्ये तणाव आहे.