Sangli Loksabha Election News : आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेत अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 असे जागावाटप झाले आहे. पण सांगली लोकसभेच्या जागेवरुन (Sangli Loksabha Election) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. कारण तिथून काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) यांनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, आता ही जागा ठाकरे गटाला सुटली आहे. त्यामुळं आता विशाल पाटील नेमकी भूमिका काय घेणार? याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं सध्या सांगलीचा तिढा सुटला की वाढला? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, उद्या सांगली काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्य पुढचा निर्णय होणार आहे. 


विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार का?


गेल्या अनेक दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता. ही जागा काँग्रेसलाच मिळेल असा विश्वास आमदार विश्वजीत कदमांसह विशाल पाटील यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्ही सांगलीच्या जागेसाठी आग्रही असल्याची भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील बोलून दाखवली होती. मात्र, अखेर जागावाटपात ठाकरे गटाला ही जागा देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील सांगली लोकसभेची जागा लढवणार आहेत. त्यामुळं आता विशाल पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जातोय.  


आमचं चुकलं काय? आता लढायचं, विशाल पाटलांचे पोस्टर व्हायरल


दरम्यान, सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर विशाल पाटील यांचे समर्थक, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमचं चुकलं काय? आता लढायचं अशा स्वरुपाचे विशाल पाटील यांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. त्यामुळं विशाल पाटील लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 




सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक होणार


दरम्यान, सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यानं कॉंग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. सांगलीच्या कॉंग्रेस भवन आणि विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असं शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं. मात्र अंतीम निर्णय विशाल पाटील घेतील. उद्या 11 वाजता बैठक पार पडणार असल्याचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं. 


महत्वाच्या बातम्या:


MVA PC: महाविकास आघाडीचा सर्व 48 जागांचा फॉर्म्युला जाहीर, सांगलीची जागा ठाकरेंनाच, कुणाची कुठे तडजोड?