मुंबई : महाराष्ट्रात इतका पैसा ओतला जातोय पण मराठी माणूस विकला जाणार नाही. पण 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटून द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला मत द्या असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं. उत्तर प्रदेशात 10 अर्भकं जळाली, पण एक जोकर महाराष्ट्रात येतोय आणि म्हणतोय, बटेंगे तो कटेंगे असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. मुंबईतील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राची आहे. हे भाजपवाले आपल्याला नेहमी सांगत आले आहेत, जर मोदी आणि शाह यांचा पराभव झाला तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील. पण 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटून द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला मत द्या. हा महाराष्ट्र मोदींच्या मित्राच्या घशात जाऊ देणार नाही.
या राज्यात गुंडगिरी, झुंडगिरी सुरू आहे. शिवरायांचे राज्य बदनाम झाले आहे. राज्यात खोक्याची भाषा सुरू आहे. पैसा असा ओतला जातोय की जमिनीतून येतोय की आभाळातून येतोय हे कळत नाही. पण महाराष्ट्र आणि मराठी माणूस विकला जाणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
यूपीत 10 अर्भकं जळाली, हा जोकर महाराष्ट्रात प्रचार करतोय
संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद आहे. शरद पवार, राहुल गांधी फिरत आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून मोदी, शाह फिरायचे बंद झाले आहेत. त्यात एक जोकर येतोय भगवे कपडे घालून. हा अपमान करतोय भगव्या कपड्याचा. तिकडे 10 अर्भकं जळून मेली आणि हा आपल्या इकडे प्रचार करतोय. अरे तुझा बाप आला पाहिजे इथे बाटायला आणि कटायला. हम बटेंगे, कटेंगे नही. पण आम्ही 23 तारखेला फाडेंगे. "
एक है तो सेएफ है असं मोदी-योगी म्हणतात. पण तुम्ही इकडे येणं बंद करा, म्हणजे महाराष्ट्र सेफ आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
फडणवीसांच्या डोक्यावर परिणाम
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, "फडणवीसांच्या डोक्यावर परिणाम काय झालाय काय माहीत? महाराष्टात निवडणुका आहेत, मग महाराष्ट्रावर बोला. महाराष्ट्रात निवडणुका जिंकले तर पाकिस्तान झेंडा फडकेल असं ते म्हणाले. त्याचा इथे काय संबंध? एवढीच हिंमत असेल तर पाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवा. 23 तारखेला सत्ता आणा आणि 26 तारखेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार आणू."
55 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. कारण महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी स्थापन केली. मराठी माणसाला मुंबई महाराष्ट्रातून हद्दपार करण्याच काम मोदी आणि अमित शाह यांनी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला दोन शत्रू लाभले आहेत मोदी आणि अमित शाह. अदानी हा मोदी यांचा मुनीम आहे. धारावी अदानीच्या घशात घालून 1 लाख कोटी रुपयांचा फायदा अदानीला होणार आहे. हे सगळं मोदी, मित शाहमुळे झालं. म्हणून आमच सरकार पाडण्यात आलं.
निवडणूक आयोग विकला गेला तरी आम्हाला विश्वास होता चंद्रचूड योग्य न्याय करतील. ते ज्यावेळी खुर्ची वर बसायचे त्यावेळी गद्दारांनी कसं चुकीच काम केलं आहे हे सांगत होते. अडीच वर्षानंतर ते निवृत्त झाले. त्यानी न्यायाला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र 20 तारखेला आपल्याला न्याय करायचा आहे असं संजय राऊत म्हणाले.
ही बातमी वाचा: