पुणे : अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्षा असलेल्या बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि नात रेवती सुळे यांना रोखण्यात आल्याची घटना घडली. या दोघी खरेदी करण्यासाठी जात असताना त्यांना पार्कच्या गेटवरच रोखण्यात आलं. प्रतिभा पवार यांनी कारण विचारल्यानंतर आम्हाला वरुन फोन आल्याचं तिथल्या वॉचमनने सांगितलं. बारामती टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल वाघ यांनी कुणाला आत सोडू नका असा आदेश दिल्याचं वॉचमनने सांगितलं.


आम्ही काय चोरी करायला आलोय का?  


बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये खरेदी करायला गेलेल्या प्रतिभा पवार यांना गेटवरच अडवण्यात आलं. वरुन सीईओंचा आदेश आल्याने आपण तुम्हाला आत सोडू शकत नाही असं तिथल्या वॉचमनने सांगितलं. त्यावर आम्ही काय चोरी करायला आलोय का असं प्रतिभा पवारांनी विचारलं. पण आपला नाईलाज असल्याचं त्या वॉचमनने सांगितलं. तो वॉचमन हिंदी भाषिक होता. 


Pratibha Pawar Baramati Textile Park : नेमकं काय घडलं? 


प्रतिभा पवार आणि त्यांच्या नात रेवती सुळे या खरेदी करण्यासाठी बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. पण त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. त्यावर आम्हाला पाहून तुम्ही गेट बंद केलं का असा प्रश्न प्रतिभा पवार यांनी विचारला. तर आम्हाला वरून आदेश आले आहे असं तिथल्या वॉचमनने सांगितलं.


तुम्हाला कुणाचा फोन आला का असा प्रश्न प्रतिभा पवार यांनी विचारल्यानंतर त्या वॉचमनने सीईओंचे नाव सांगितलं. त्यामुळे हा आदेश अनिल वाघ नावाच्या सीईओंनी दिल्याचं समोर आलं. त्यावर आत संगळं बंद आहे का असं प्रतिभा पवार यांनी विचारल्यानंतर आत सगळं सुरू आहे, पण तुम्हाला सोडू शकत नाही असं उत्तर आलं. 


प्रतिभा पवार म्हणाल्या की, "आम्ही चोरी करायला आलो नाही. आम्ही खरेदीला आलो आहे. वरून फोन आलेला ना. आता त्याला फोन करून विचारा आत सोडू का ते. त्यांना खरेदी करायची आहे असं सांगा त्यांना."


जो टेक्स्टाईल पार्क शरद पवारांनी बारामतीमध्ये आणला त्याच पार्कमध्ये जायला त्यांच्या पत्नीला अर्धा तास गेटवर थांबावं लागतंय हे दुर्दैव आहे. सत्ता त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते करतात अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. 


 



ही बातमी वाचा: