मुंबई : अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या तिकीटावर सलमान इंदूरमधून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमानला मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा मानस आहे.


रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये प्रभू श्रीरामाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते अरुण गोविल इंदूरमधून लोकसभा निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आता सलमानचं नाव पुढे आलं आहे. सलमान खान किंवा काँग्रेसकडून अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा आलेला नाही.

सुमित्रा महाजन या इंदूरमधून सलग आठव्यांदा खासदार आहेत. त्यामुळे भाजपकडून ही सीट खेचून आणण्यासाठी काँग्रेस जंग-जंग पछाडताना दिसत आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचं नाव सुचवलं होतं. नुकतंच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं.

सलमानचा जन्म मध्य प्रदेशचा आहे. कल्याणमल नर्सिंग होममध्ये सलमानचा जन्म झाला. त्यामुळे जन्मभूमीत सलमानला जनमत मिळेल, असा काँग्रेसचा अंदाज आहे.

याआधी करिना कपूरला लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचं वृत्त होतं. मात्र करिनाने निवडणुका लढवण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केल्याने चर्चेचा धुरळा खाली बसला होता.