Election Commission of India : उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारादरम्यान पाच राज्यात काळ्या पैशांचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने सांगितले की, पाच राज्यातून एक हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीचे घबाड जप्त केले आहे. यामध्ये पैसे, दारु आणि ड्रग्जसह अन्य सामानाचा समावेश आहे. 2017 निवडणुकीच्या तुलनेत तीनपट जास्त घबाड जप्त करम्यात आले आहे. 


उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या राज्यातून एक हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीचे घबाड जप्त करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी याची माहिती दिली. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये चार टप्प्यातील मतदान बाकी आहे. तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.  
 
पंजाबमध्ये जप्त केले सर्वाधिक घबाड -
आश्चर्य़चकीत करणारी बाब म्हणजे, सर्वाधिक घबाड पंजाबमधून जप्त करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधून आतापर्यंत 91.30 कोटी रोख रक्कम, 54 कोटी किंमतीची 20 लाख लीटर दारुसह 307 कोटी रुपये किंमतीचे घबाड जप्त करण्यात आले आहे. पंजाबमधून आतापर्यंत 33.79 कोटी रोख रक्कम,  36.79 कोटी रुपये किमतीची दारु, 143 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्जसह आतापर्यंत 510.91 कोटी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आले आहे.  


गोव्यात सर्वात कमी -
मणिपूरमध्ये 167.83 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी देण्यात येणारे इतर साहित्यही मणिपूरमधून जप्त करण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 18.81 कोटी आणि गोव्यात 12.73 कोटी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आले आहे. याशिवाय या दोन्ही राज्यातून दारु आणि इतर किमती साहित्यही जप्त करण्यात आले आहे. 






मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live