मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना फसवलं असा आरोप भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिला मातोंडकरांचा बळी दिल्याचा आरोप गोपाळ शेट्टी यांनी केला.


उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली. उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र सुरुवातीचे कल पाहता उर्मिला मातोंडकर चांगल्याच पिछाडीवर आहेत.

संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिला यांचा बळी दिला. मात्र उर्मिला आणि निरुपम या दोघांना त्याचा फटका बसेल, असा घणाघात गोपाळ शेट्टींनी केला. माझी लढाई उर्मिला यांच्याशी नाही, तर काँग्रेसशी असल्याचं त्यांनी सांगितलं.

2014 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार संजय निरुपम यांच्यावर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. यावेळी संजय निरुपम यांनी आपल्यासाठी उत्तर पश्चिम मुंबई या सुरक्षित मतदारसंघाची निवड केल्याचं शेट्टींनी सुचवलं. प्रत्यक्षात तिथेही ते पिछाडीवर असून शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांना मोठी आघाडी मिळाली.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार केली आहे. मागाठणेमध्ये ईव्हीएम 17c फॉर्मवर स्वाक्षरी आणि मशिनच्या क्रमांकात तफावत असल्याचा दावा त्यांनी ट्विटरवरुन केला आहे.