मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप (BJP) हा पहिला पक्ष ठरला आहे. महायुतीच्या मोठ्या विजयानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की अजित पवार (Ajit Pawar)? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे. 


राज्यात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. यात ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. भाजपच्या यशात ओबीसी समाजाचा वाटा असल्याची चर्चा होत असतानाच ओबीसी नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नुकीतच भेट घेतली. या भेटीनंतर ओबीसी समुदायाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली जाणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे, असे म्हटले आहे. 


नेमकं काय म्हणाले बबनराव तायवाडे?


बबनराव तायवाडे म्हणाले की, गेल्या दीड वर्षात मराठा समाजाने जे आंदोलन केलं. त्याच वेळेस ओबीसी समाजाने आंदोलन उभारलं होतं. मराठा समाजाला संपूर्ण आंदोलनात काहीच मिळाले नाही. पण, ओबीसी समाजाने आपल्या आंदोलनाद्वारे ज्या ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जातीय जनगणना सोडल्यास ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. पण सरकारने जातीय जनगणनेबाबतही आश्वासन दिले आहे. उर्वरित मागण्याचे शासन निर्णय देखील निघाले आणि त्याची अंमलबजावणी झाली आहे. हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय आहे. 


नवीन सरकार ओबीसी समाजाला सहाय्य करेल


त्यामुळे मराठा समाजाला काहीच मिळालं नसल्याने फार मोठी खदखद आंदोलनकर्त्यांमध्ये आहे. आम्ही आंदोलनात कुठल्याही राजकीय नेत्याला टार्गेट केलं नाही, शिव्या दिल्या नाही. पण मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेते छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, राज्याचं मंत्रिमंडळ आणि अनेक नेत्यांचा अनेकदा एकेरी उल्लेख केला होता. मात्र तीच मंडळी पुन्हा अत्यंत मताधिक्याने निवडून आले आहे आणि त्यांचं सरकार आता बसणार आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा नव्याने ते आपल्या मागणीचा आग्रह धरतील. पण, मी वारंवार सांगितला आहे की, कुठलीही मागणी ही संविधानाच्या कक्षेत बसणारी असावी. याचा अभ्यास त्यांनी करावा आणि नंतर त्या मागणीचा आग्रह करावा, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.  नव्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडू नये. राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे, अशी मागणी देखील बबनराव तायवाडे यांनी केलीय. तसेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सहकार्य केले आहे. आमच्या उर्वरित मागण्या पूर्ण करण्याकरता नवीन सरकार ओबीसी समाजाला सहाय्य करेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलीय. 


आणखी वाचा 


Eknath Shinde: मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार? राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट; म्हणाले, एकत्रित निवडणूक लढवली अन्...