गडचिरोली  :  राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election)  घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय नेतेमंडळी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील झाल्याचं पाहायला मिळालं.गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची मानली जाणारी आरमोरी विधानसभा जिंकण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड सुरू आहे. आतापर्यंत कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ बघायला मिळत होती. दुसरीकडे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांची उमेदवारी भाजप कायम ठेवली आहे. 


गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आरमोरी विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा भाजपने विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदार संघात हॅटट्रिक करून नवीन रेकॅार्ड बनविण्यासाठी आमदार गजबे यांची जोमाने तयारी सुरू आहे. दुसरीकडे गजबे यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीत यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. काँग्रेसचे अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना शिवसेनेने (उबाठा) या मतदार संघावर दावा केला आहे. हा पेच सुटल्यानंतरच महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 2014 आणि 2019 अशा दोन निवडणुकांमध्ये कृष्णा गजबे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. यावेळी तिसऱ्यांदा ते विजय मिळवतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. वास्तविक या मतदार संघात सलग तीन वेळा निवडून येणे आजपर्यंत कोणालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे आमदार गजबे यात यशस्वी झाल्यास त्यांच्या नावावर एक रेकॅार्ड तयार होणार आहे. 


काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड


आरमोरी विधानसभा मतदारसंघात  काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड सुरू आहे. आरमोरी मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.  आरमोरी विधानसभेतून काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. आरमोरी विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून रामदास मसराम आणि आनंदराव गेडाम उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. रामदास मसराम यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रात लोकांच्या हाताला काम नसल्याचं सांगितलं. तसेच शेतकऱ्यांचा मुद्दा, रस्ता, शिक्षण, आरोग्याच्या खूप समस्या आहेत, असं रामदास मसराम यांनी सांगितले. 


आनंदराव गेडाम यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार?


आनंदराव गेडाम हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आरमोरी मतदारसंघात कृष्णा गजबे आणि आनंदराव गेडाम यांचा सामना झाला होता. यामध्ये 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत आनंदराव गेडाम यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेस आनंदराव गेडाम यांना तिसऱ्यांदा संधी देणार की यंदा नवीन चेहरा मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हे ही वाचा :


Gadchiroli Vidhan Sabha constituency: गडचिरोली विधानसभा मतदारसंघात कोणाचे पारडे वरचढ; भाजप की काँग्रेस,कोण बाजी मारणार?