सातारा :  राष्ट्रवादी सोडण्याची मनाची तयारी आहे, परंतु युतीच काय होतं हे पाहून निर्णय घेणार सुतोवाच रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. ते फलटणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्याआधी शरद पवार यांना या वयात सोडून जाण्याचा विचार करु शकत नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर सावध भूमिका घेतली आहे. शरद पवारांना दुखावलं तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही पण शरद पवारांना दुखावलं नाही तर समोरच्या हजारों लोकांचं आयुष्य चांगलं होणार नाही, असेही ते म्हणाले.


उदयनराजे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्यानंतर रामराजे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, आजचा कार्यकर्ता मेळावा हा त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आहे. यात कुठलाही निर्णय होईलच असं नसल्याचं रामराजे म्हणाले आहेत. आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत. उद्याचं उद्या पाहू म्हणत रामराजेंनी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतं आहे.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, कुठलाही राजकीय निर्णय घेण्याच्या आधी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही नेहमीच मतदानाच्या आधी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतो. पक्षात कुठल्या जायचं, पक्ष सोडायचा की नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही मला दिलेला आहे. पण तरुण पिढीसाठी आपल्याला हे करावं लागणारं आहे. आज तरुण पिढीला आपणं मार्गदर्शन करण्याऐवजी तरुण पिढी आपल्याला मार्गदर्शन करते. माझ्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो शरद पवारांना न दुखावता निर्णय घेण्याचा. शरद पवारांना दुखावलं तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही पण शरद पवारांना दुखावलं नाही तर समोरच्या हजारों लोकांचं आयुष्य चांगलं होणार नाही, असेही ते म्हणाले.

काही लोकांचं मत आहे की शरद पवारांना यावेळी या अवस्थेत सोडून जाऊ नये. तरुण पिढी मात्र म्हणते सत्तेत जायला पाहिजे. पण तिथं दोन पक्ष आहेत, त्यांच्यात युती होते का आणि युतीत फलटण मतदारसंघ कुठं जातो हे अजून काहीच कळलेलं नाही.  मात्र पत्रकारांनी आधीच जाहीर करुन टाकलंय, असेही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.