Rajya Sabha Elections 2022 : महाराष्ट्रात तब्बल 18 वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आमदारांना आपल्या बाजूंना खेचण्याची रस्सीखेच सुरु आहे. अशात मनसेचं मत कुणाला जाणार? याची चर्चा सुरु आहे. याबाबत राजू पाटील यांच्याशी चर्चे केली. ते म्हणाले की, राज साहेबांच्या आदेशाप्रमाणेचं मतदान करणार आहे. अन्यथा तटस्थ भूमिका घेऊ..
सध्यातरी राज साहेबांकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे ते जसे सांगतील त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल. मतदान करायचं, कुणाला करायचं? की तटस्थ रहायचे? हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राज साहेब सांगतीर त्याप्रमाणे मतदान करू किंवा तटस्थ राहू, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मनसे कुणाच्या पारड्यात मत टाकणार की तटस्थ राहणार? याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल 18 वर्षानंतर राज्यात निवडणूक होत आहे. यंदा या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपला आपल्या आमदारांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचंही मत मोलाचे ठरणार आहे. मनसे आपला कौल शिवसेनेच्या पारड्यात टाकणार की भाजपला साथ देणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप - मनसे नेत्यांच्या जवळीक वाढलेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी मनसे आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला होता. मात्र संभाजी राजेंनी माघार घेतली. त्यानंतर अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नाही.
याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही सभागृहात सध्या तटस्थ म्हणून आहोत. जेव्हा फ्लोर टेस्टिंग झाली तेव्हा आम्ही तटस्थ राहिलो. आता मागच्या वेळेस छत्रपती संभाजीराजेंचा फोन आणि मेल आलेला, त्यावेळेस राज साहेबांचा आदेश घेऊन त्यांचे नॉमिनेशन फॉर्मवर सही पण केली होती. परंतु या क्षणाला तरी मला राज साहेबांकडून काही आदेश नाहीये. त्यामुळे ते जसे सांगतील त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल. मतदान करायचं, कोणाला करायचं की तटस्थ रहायचे? हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राज साहेब सांगतिल त्याप्रमाणे आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू असं सांगितलं.