मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये धावपळ सुरू असली तरी काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत धूसफूस सुरू असल्याचं चित्र आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राच्या कोट्यातून उत्तर प्रदेशमधील इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर केल्यानं राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये धूसफूस सुरू असल्याचं समजतंय. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील बडे नेते मुकुल वासनिक यांना मात्र राजस्थानमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यामागे काँग्रेसचे गणित काय आहे हे मात्र अद्याप समजत नाही. 


राज्यसभेसाठी भाजपने तीन, शिवसेनेने दोन, राष्ट्रवादीने एक तर काँग्रेसने एक उमेदवार जाहीर केला आहे. यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्राच्या कोट्यातून उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नाराज असून राज्यातील नेत्याला संधी मिळायला हवी होती असं मत त्यांनी खासगीत व्यक्त केलं. 


18 वर्षांची तपस्या फिकी
काँग्रसने राज्यातील स्थानिक नेत्याला संधी द्यायला हवी होती असं मत अनेक काँग्रेस नेत्यांनी खासगीत व्यक्त केल्याची माहिती आहे. काँग्रेस नेत्या नगमा यांनी आपल्याला ही उमेदवारी मिळायला हवी होती अशी मागणी केली आहे. इम्रान प्रतापगढी यांच्यासमोर आमची 18 वर्षांची तपस्या फिकी पडली असं म्हणत नगमा यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 


 






अजूनही वेळ गेलेली नाही: पृथ्वीराज चव्हाण
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मात्र, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून आणि महाराष्ट्रात बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे, मी मुकुल वासनिक यांच्यासोबत बोललो आणि त्यांना विनंती केली की शक्य असल्यास त्यांनी महाराष्ट्रातून उमेदवारी घ्यावी. मला असे वाटते की मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली पाहिजे.अजून ही वेळ आहे.


छत्तीसगड आणि राजस्थान या दोन्ही राज्यात सर्व उमेदवार बाहेरील आहे हे आश्चर्यकारक आहे. त्या सर्व जागा तर बदलता येणार नाही. महाराष्ट्रातील एका जागेबद्दल नक्कीच करता येईल. मुकुल वासनिक राजस्थानमधील अर्ज मागे घेऊ शकतील आणि इमरान प्रतापगडी महाराष्ट्रातील अर्ज मागे घेऊन नवे अर्ज दाखल करू शकतील.