मुंबई: महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व नाट्य घडतंय. पण ही अवस्था फक्त महाराष्ट्रातीलच आहे असं नाही, तर राजस्थान आणि कर्नाटकात क्रॉस व्होटिंग तसेच हरयाणामध्ये नाराजी नाट्य अशा घटना घडल्या आहेत. चार राज्यातील फक्त 16 जागांसाठी मतदान होतं पण सगळीकडे फक्त आणि फक्त महानाट्य दिसलं.


खरंतर राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होणार होती. पण त्यातल्या 41 जागा बिनविरोध झाल्या. म्हणून मग महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि हरिणायात निवडणूक लागली. महाराष्ट्रात तर 24 वर्षांनंतर राज्यसभेसाठी मतदानाची वेळ आली आणि तसंच नाट्य पाहायलाही मिळालं.


भाजपचा आक्षेप आणि निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये
राज्यात सहा जागांसाठी मतदान झालं आणि भाजपनं आपल्या प्रत्येक आमदाराला मतदानासाठी आणलं. त्यात मोठ्या आजारांशी लढत असलेल्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना अॅम्ब्युलन्समधून आणलं. तर एमआयएम, समाजवादी पक्षांनी महाविकास आघाडीला मतदान केलं. वेळेत मतदान झालं, पण निकाल थांबला. कारण भाजपनं आक्षेप घेतला आणि केंद्रीय निवडणूक आयोग पिक्चरमध्ये आला.


राजस्थानात क्रॉस व्होटिंग
तिकडे राजस्थानात 4 जागांसाठी 199 जणांनी मतदान केलं पण, चर्चेत राहिल्या त्या भाजपच्या आमदार शोभाराणी कुशवाह. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं आणि त्यामुळे त्यांचं मत बाद झालं. पण अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात तिथं काँग्रेसचे मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी हे तिघेही विजयी झाले.


हरियाणात राजकीय नाट्य 
हरियाणातही राजकीय नाट्य सुरु होतं. तिथं राज्यसभेच्या दोन जागांसाठी 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केलं. पण काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचा दावा भाजपनं केला आणि महाराष्ट्राप्रमाणेच तिथलाही निकाल लांबला. भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसची दोन मतं रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे काँग्रेसचे अजय माकन यांची जागा धोक्यात आली आहे. त्या विरोधात काँग्रेसनंही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.


कर्नाटकात क्रॉस व्होटिंग
कर्नाटकातही चार जागासाठी मतदान झालं. पण, चर्चा झाली ती जनता दल सेक्युलरच्या एका आमदाराची. के. श्रीनिवास गौडा या जेडीएसच्या आमदारनं थेट काँग्रेसला मत दिलं. त्यामुळे त्यांचं मत बाद झालं. पण तिथंही निकाल लांबला. खरंतर, कर्नाटकात 4 पैकी भाजप दोन, काँग्रेसची 1 जागा निश्चित होती. चौथ्या जागेवर काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये लढत झाली. पण क्रॉस वोटिंगमुळे हीच जागा फसली.


गेल्या दोन आठवड्यापासून राज्यसभेचा जो ड्रामा सुरु आहे तो आज संध्याकाळी संपणं अपेक्षित होतं. पण, हाच ड्रामा आता रात्रभर चालेल. कारण चार पैकी तीन राज्यात चित्र अजूनही अस्पष्ट आहे.