मुंबई: संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Continues below advertisement


उद्या दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आला होता. यावर शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती. आता शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची माहिती आहे.


मराठा मोर्चा समन्वयकांशी चर्चा करुन निर्णय घेणार
शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशीही मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती.


राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.


आमचा पाठिंबा महाविकास आघाडीला नव्हे तर शिवसेनेला
मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी चर्चा करताना शरद पवार म्हणाले की, संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावं अशी इच्छा आहे. शिवसेना पुरस्कृत किंवा शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारालाच राष्ट्रवादी पाठींबा देणार. संभाजीराजे यांना राष्ट्रवादीचा पाठींबा असं आपण कधी बोललो नाही, माझ्या नांदेडमधील वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. 


महत्त्वाच्या बातम्या: