पुणे: माझ्या नांदेडमधील वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, महाविकास आघाडी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावं अशी इच्छाही त्यांनी बोलावून दाखवली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज शरद पवारांची भेट घेतली.


राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी शरद पवारांची आज पुण्यामध्ये भेट घेतली. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावं अशी इच्छा आहे. शिवसेना पुरस्कृत किंवा शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारालाच राष्ट्रवादी पाठींबा देणार. संभाजीराजे यांना राष्ट्रवादीचा पाठींबा असं आपण कधी बोललो नाही, माझ्या नांदेडमधील वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. 


शरद पवार यांनी नांदेडच्या त्या व्हायरल व्हिडीओबाबत शिष्टमंडळासमोरं आपली भूमिका स्पष्ट केली. महविकास आघाडीचा नाही तर शिवसेना पुरस्कृत किंवा शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावर शरद पवार ठाम असल्याचं स्पष्ट झालं. यापूर्वीच्या बैठकांमध्ये सहावी जागा शिवसेनेला सोडण्याचं निश्चित झाल्याने शरद पवार यांचा सेनेच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचा निश्चय आहे. 


संभाजीराजेंचा उद्या शिवसेनेत प्रवेश?
दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींना उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावल्याची माहिती समोर येत आहे. याच वेळी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.उद्या दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप शिवसेनेच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आल्याचं सांगितलं जातय. शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. पण संभाजीराजेंनी याला अद्याप मान्यता दिली नाही. त्यांनी एक दिवसाची वेळ मागितली आहे. पण संभाजीराजे शिवसेनेची ही ऑफर स्वीकारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.