मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस असून एक- एक मत महत्त्वाचं आहे. अशात आता शिवसेनेला धक्का बसला असून शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिली आहे. त्याचवेळी यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे मुनगंटीवर आणि रवी राणा यांचे मत वैध ठरवण्यात आलं असल्याची माहिती आहे. 


 







शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना फटका
सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या मताचं गणित बिघडणार आहे. संजय राऊत यांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 42 मतांची गरज आहे. तर संजय पवार यांनाही दुसऱ्या पसंतीच्या मताची गरज आहे. पण जर सुहास कांदे यांनी संजय राऊत यांना पहिल्या पसंतीचे मत दिले असेल आणि संजय पवार यांना दुसऱ्या पसंतीचे मत दिले असेल तर त्यांचे मत बाद ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना यांना मोठा फटका बसणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. 


सुहास कांदेंची प्रतिक्रिया
यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, "शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे. मला अद्याप कोणतीही माहिती नाही. पण निकाल आल्यानंतर त्यावर कोर्टात जायचं का नाही ते ठरवू."


भाजपने महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात आठ तासांपासून निकाल रखडला होता.


सुहास कांदे वगळता इतरांनी नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.