मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे एक-एक आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, आपण कुणाला मतदान करणार हे उद्या (शुक्रवारी) सकाळी 9 वाजता जाहीर करु असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीने बोलवलेल्या डिनर डिप्लोमसीला ते उपस्थित होते. एमआयएमचे दोन आमदार असून त्यांच्या भूमिकेला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, "एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत कुणी आपल्याकडे पाठिंबा देण्याची मागणी घेऊन येत नाही तोपर्यंत आपण आपली भूमिका स्पष्ट करायची नाही. आता महाविकास आघाडीकडून आपल्याला आमंत्रण दिलं होतं. आज झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली. एमआयएमच्या दोन्ही आमदारांची तक्रार असते की त्यांना देण्यात येणाऱ्या विकास निधीमध्ये भेदभाव केला जातो. यावर चर्चा करण्यात आली."
इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, "वक्फ बोर्डाची जागा आहे त्यावर अनेक सरकारी कार्यालये आहेत. ते कोणतेही भाडे देत नाहीत, तो देण्यात यावा. दुसरं म्हणजे एमपीएससीच्या समितीमध्ये एक अल्पसंख्यांक सदस्य असायचा, तो आता नाही. तो असावा अशी मागणी आम्ही केली आहे. या सर्व गोष्टींवर आज ओवैसी यांच्याशी आहोत. त्यावर उद्या औवैसी सकाळी 9 वाजता आपली भूमिका जाहीर केली आहे."
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी यावर सविस्तर बोलू असं खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
शुक्रवारी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार असून सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक एकमेकांसमोर उभे असून एक-एक मत हे मतत्त्वाचं आहे.
दरम्यान, राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर उद्या सकाळी निर्णय होणार आहे.