कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये जमलं नाही, मात्र विधानसभेला जमलं अशी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी मतदारसंघांमध्ये झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. मात्र त्यांना अखेरपर्यंत प्रयत्न करून यश आलं नव्हतं. मात्र, आता विधानसभेला पुन्हा एकदा संदर्भ बदलले आहेत. राजू शेट्टी यांनी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सत्यजित पाटील यांना मोठा ताकद मिळाली आहे. पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्यामध्ये शाहुवाडी विधानसभेला थेट दुरंगी लढत होत आहे.
सत्यजित पाटील यांना मोठी ताकद मिळाली
शाहूवाडी तालुक्यामध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोठं वर्चस्व आहे. शेट्टी यांचा हा लोकसभा मतदारसंघ असल्याने सत्यजित पाटील यांना मोठी ताकद मिळाली आहे. आज (6 नोव्हेंबर) सत्यजित पाटील यांनी राजू शेट्टी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत चर्चा केली. यावेळी राजू शेट्टी यांनी सतेज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
शिरोळमध्ये राजू शेट्टींना पायाला भिंगरी लावली
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी आपल्या बालेकिल्ल्यामध्ये लक्ष केंद्रित केलं आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांची स्वाभिमानी संघटनेमध्ये घरवापसी झाली असून त्यांना स्वाभिमानीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिरोळचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी राजू शेट्टी यांनी मतदारसंघांमध्ये पायाला भिंगरी लावली आहे. दुसरीकडे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्येही ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांना स्वाभिमानीमध्ये प्रवेश देत त्यांना सुद्धा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा शेट्टी आपल्याकडे खेचतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
2019 मध्ये उल्हास पाटील यांनी विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. स्वाभिमानीचे सावकार मादनाईक तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे या दोन्ही मतांची बेगमी यावेळी उल्हास पाटील यांच्या बाजूने झाल्यास ते राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतात. दुसरीकडे सत्यजित पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाने मताधिक्य दिले होते. त्यामुळे त्या मतांच्या जोरावर आणि राजू शेट्टी यांचं पाठिंब्याने गणित जुळल्यास आमदार विनय कोरे यांच्या समोर नक्कीच तगडं आव्हान निर्माण झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या