नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात कायम नेहरु, गांधी कुटुंबावर टीका करतात, पण मोदींनी जे प्रधानसेवक आणलं ते वाक्यही जवाहरलाल नेहरुचं आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच मोदींना चुकीचा इतिहास माहित आहे, अशी टीकाही केली.


काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अर्थात नांदेडमध्ये आज राज ठाकरेंची प्रचार सभा झाली. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहेत. या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात केलेल्या भाषणांच्या क्लिपचा आधार घेत, मोदींनी दिलेली आश्वासनं किती पोकळ होती, हे आपल्या भाषणातून सांगितलं. गेली साडेचार वर्ष मोदींनी जनतेंची फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलतच नाहीत. संपूर्ण निवडणूक पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर केवळ आरोप करताना मोदी दिसत आहेत. मात्र बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्यांबद्दल कधी बोलणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

नेहरुंच्या वाक्यावरुनच मोदींचं प्रधानसेवक!
याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, "मोदींनी जे प्रधानसेवक आणलं, ते वाक्यही जवाहरलाल नेहरुंचं आहे. दिल्लीतल्या स्मृती भवनमध्ये मोठी पाटी आहे, त्या पाटीवर पंडित नेहरुंचं वाक्य लिहिलं आहे. फक्त त्यांनी वेगळा शब्द वापरला आहे. नेहरुंचं वाक्य असं आहे, "यह देश की जनता मुझे प्रधानमंत्री कहके ना पुकारे, इस देश की जनता मुझे प्रथमसेवक कहके बुलाए." ते 'प्रथमसेवक' यांनी 'प्रधानसेवक' केलं."

मोदींना चुकीचा इतिहास माहित
"मध्यंतरी एका दक्षिणेतील राज्यात भाषण करताना मोदींनी नेहरुंचा विषय काढला. मोदी म्हणाले होते की शहीद भगतसिंह जेलमध्ये असताना नेहरु परिवारातील कोणी त्यांना भेटायला का नाही गेला? आता गोष्टीचा निवडणुकांशी काय संबंध? रोजच्या जगण्याशी याचा काय संबंध आहे? एकतर मोदींना चुकीचा इतिहास माहित आहे. 1929 सालच्या ट्रिब्यून या वर्तमानपत्रात छापलेल्या बातमीनुसार, पंडित नेहरु हे एकमेव व्यक्ती जे भगतसिंहांना जेलमध्ये दोनदा भेटून, त्यांची विचारपूस करुन आले. आता काँग्रेसी परिवार म्हणजे कोण? तर नेहरुच ना, मग ते दोनदा जाऊन आले. शहीद भगतसिंह जेलमध्ये असताना इंदिराजी 14 वर्षांच्या होत्या, म्हणजे भगतसिंहांना जेलमध्ये जाऊन भेटणं हा विषयच नाही. त्यामुळे राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी पत्ताच नाही. आता इंदिराजीच 14 वर्षांच्या होत्या तर बाकीच्यांचा विषयच येत नाही."