मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नांदेडमध्ये जाहीर सभा आज होत आहे. एकीकडे या सभेच राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाला वेगळाच प्रश्न सतावत आहे.
राज ठाकरे यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यावेळी आपण भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार राज ठाकरेंनी यांच्या विविध सभा राज्यभरात होणार आहे. आजच्या राज ठाकरेंच्या सभेला काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण उपस्थित राहणार की नाही, अशी चर्चा सध्या नांदेडमध्ये सुरु आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कवरील विराट सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे नांदेडमध्ये आज राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.