नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे बंधू आणि महायुती असा थेट सामना मुंबई महापालिकेत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरुन ठाकरे बंधूंनी जाहीर सभेत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणात मुंबईतील विमानतळाची (Airport) जागा हडपण्याचा डाव असल्याचे सांगितले. एकीकडे राज ठाकरेंनी मुंबई विमानतळाची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला असता, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत तिसरं विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे. वाढवण बंदराजवळ हे तिसरे विमानतळ उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील (navi mumbai) महापालिका निवडणुकांच्या प्रचारात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
पनवेलमध्ये मोठी वाहतूक कोंडी असून दिल्ली-वडोदरा हायवेमुळे नवी मुंबई अन् पनवेलमधील वाहतूक कोंडी सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथील कळंबोली जंक्शन सुधारणार आहे, आपण तुर्भे टनल करतोय, विमानतळ कनेक्टिविटीसाठी दोन वेगळे मार्ग उभारणार आहोत. सिडको ने 59 किलो मीटर मेट्रोचे जाळे हाती घेतले आहे. त्यातून, नवी मुंबई विमानतळ ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मेट्रोने जोडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, कल्याण-डोंबिवली शहरही भविष्यात मेट्रोने जोडणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
मुंबईतील पहिलं विमानतळ राहणार आहे, नवी मुंबईचं राहणार आहे आणि मुंबईला तिसरे विमानतळ उभारणार असून मुंबई, नवी मुंबईनंतर आता वाढवण बंदराजवळ तिसरे विमानतळ उभारणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, राज्य सरकार विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणांचा सखोल अभ्यास करणार आहे. कोणती जागा अधिक सोयीची, वाहतुकीसाठी उपयुक्त आणि दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरेल यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
अटल सेतूचं काम गतीने मार्गी लावलं
सन 1990 साली नवी मुंबई विमानतळ होणार असल्याची घोषणा झाली होती. पण, प्रत्यक्षात अत्यंत संथ गतीने काम चालू होते. भाजप सरकार केंद्रात, राज्यात आल्यावर लगेच सर्व परवानग्या घेऊन विमानतळाच्या कामाला सुरवात झाली. तर, अटल सेतूचा प्लान जे. आर. टाटा यांनी 1962 मध्ये तयार केला होता. पण, त्यांच्या प्लॅनला सरकारने प्रतिसाद दिला नव्हता. अनेक अडचणी होत्या, परवानग्या असंख्य होत्या. वॅार रुममध्ये हे काम हाती घेतले. प्रचंड पाठपुरावा केल्याने लवकर प्रोजेक्ट मार्गी लागले, असेही फडणवीसांनी सांगितले.
2050 पर्यंत दोन धरणे होतील
मुंबईतील अटल सेतू टोल फ्री होणार नाही, त्याचा परतावा टोलवर आधारित आहे. कारण, कर्जाचा परतावा आहे. येथील टोलसाठी 25 टक्के दर आम्ही टोलचे कमी ठेवले आहेत. स्वयं पुनर्विकास करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. यामध्ये लोकांना घरांचा ऐरिया मोठा मिळतो आहे. पनवेलमध्ये पाणी समस्या सोडविण्यासाठी भविष्यात पोशीर आणि शिरा ही दोन धरणे बांधली जाणार आहेत. तर, 2050 पर्यंत ही दोन धरणे तयार होतील. पनवेल आणि एमएमआरए मधील सर्वांना पाणी मिळणार आहे. एमएमआरडीएने हे दोन धरणे उभारावीत, याचे टेंडर निघाले असून काम सुरू झाले आहे, अशी माहितीही फडणवीसांनी दिली. दरम्यान, माझ्यावर जीवनपट निघालाच तर त्याचे नाव “आपले देवा भाऊ “ असेल. माझी भूमिका कोण करेल, त्यासाठी वजन वाढवावे लागेल. प्रसादला वजन वाढवावे लागेल.
हेही वाचा
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते