सातारा : डिलीव्हरी अवघ्या काही तासांवर असताना थेट दवाखान्यातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या गर्भवतीला कन्यारत्न झालं. साताऱ्यातील प्राची घाडगे यांनी संध्याकाळी मुलीला जन्म दिला.


प्राची घाडगेंनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी पतीनिधनाचा धक्का पचवला होता. डिलीव्हरी अवघ्या काही तासांवर असताना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या थेट दवाखान्यातून मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. साताऱ्यात गोडोली येथील पोलिस वसाहत जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदान केलं होतं.

अवघडलेल्या परिस्थितीतही आदर्श मतदार असल्याचं दाखवून दिल्यानंतर प्राची घाडगेंचं सर्वत्र कौतुक होत होतं. प्राची यांना आज (मंगळवार 23 एप्रिल 2019) संध्याकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी मुलगी झाली. प्राची यांचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले होते.

VIDEO | रुग्णालयात अॅडमिट होण्यापूर्वी 9 महिने 9 दिवस गर्भवतीचं मतदान | सातारा | एबीपी माझा



लोकशाहीचा उत्सव सर्वसामान्य जनतेला साजरा करता यावा, यासाठी प्रशासन प्रत्येक भारतीय नागरिकाला जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच प्राची यांनी जागृत मतदाराची भूमिका बजावल्याने त्यांचं कौतुक होत होतं.

दरम्यान, मतदान करणे हे लोकशाहीतलं महत्त्वाचे कर्तव्य आहे. सर्वांनी आपला मताधिकार बजावणं गरजेचं आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मतदानासाठी आल्याचं प्राची यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं होतं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्राची पुन्हा दवाखान्यात अॅडमिट झाल्या.