मुंबई : 'राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला', असं वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यानी केलं आहे. त्यामुळे राज्यातील 48 पैकी 37 ते 40 जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा घेत भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या या सभांचा भाजपलाच फायदा झाला असं विनोद तावडे यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना म्हटलं आहे. "मुंबईत दीड-दोन तास रांगेत उभं राहुन लोकांनी मतदान केलं. त्यांना कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की मोदी आले पाहिजेत म्हणून आलोत. राहुल गांधी-राज ठाकरे काहीही बोलतात. याचा परिणाम म्हणुन कोणी त्यांना मत दिली तर अडचण नको म्हणुन आम्ही मतदानाला आलो आहोत", असं आपल्याला लोकांनी सांगितल्याचं तावडे म्हणाले.



कुटुंबावर बारामतीच्या पराभवाचं खापर नको म्हणुन पवारांचं ईव्हीएमकडे बोट : विनोद तावडे

'शरद पवारांना पराभव समोर दिसत असून आता अपयशाचं खापर फुटू नये म्हणून ते ईव्हीएकडे बोट दाखवत आहेत', अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं खळबळजनक विधान केलं आहे.