नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची अमेठीतील उमेदवारी रद्द करण्याची अपक्ष उमेदवाराची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींचा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निवडणूक अधिकारी राम मनोहर मिश्रा यांनी ही उमेदवारी वैध ठरवली.


अमेठीमधून अपक्ष निवडणूक लढवणारे ध्रुव लाल यांच्या वकिलांनी राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचं सांगत उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. ध्रुव लाल यांच्या वकिलांनी ब्रिटनमधील एका नोंदणीकृत कंपनीच्या कागदपत्रावरुन राहुल गांधींवर आरोप केले होते.

निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्यानंतर राहुल गांधींच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला  होता. आज सोमवारी सकाळी त्यावर निर्णय सुनावण्यात आला.

दरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांनीही राहुल गांधींवर आरोप केला होता, की त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व घेतलं आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी. त्यावर आज सुनावणी झाली. याआधी भाजपाध्यक्ष अमित शाह, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच अनेक बड्या नेत्यांनी राहुल गांधींचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहण्याची मागणी केली होती.

राहुल गांधींच्या नागरिकत्वावरुन अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती. ज्यावर केंद्र सरकारच्या सक्षम यंत्रणांकडे तक्रार करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.