नवी दिल्ली :  पंजाबमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. नवज्योतसिंह सिद्धू मला हटवून मुख्यमंत्री होऊ इच्छित आहेत, असे अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे की, मी सिद्धू यांना लहानपणापासून ओळखतो. कदाचित मला बाजूला सारून त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला काही फरक नाही पडणार, मात्र पक्षाला मात्र यामुळे फरक पडू शकतो. केंद्रीय नेतृत्वाने याकडे लक्ष दिले आहे. कॉंग्रेस पक्ष शिस्त मोडणाऱ्यांची गय करत नाही, असे अमरिंदर सिंह म्हणाले.

पंजाब सरकारमधील मंत्री असलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी शनिवारी 'जर कॅप्टन अमरिंदर यांच्या राज्यात धर्मग्रंथांचा अपमान करणाऱ्या दोषींना शिक्षा दिली नाही, तर मी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देईल' असं वक्तव्य केलं होतं.

यापूर्वी नवज्योतसिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी 'कॅप्टन अमरिंदर कौर यांच्यामुळे माझे तिकीट कापले गेले' असे म्हटले होते.

नवज्योत कौर चंदीगडच्या जागेवरून लोकसभा लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र काँग्रेसने माजी रेल्वेमंत्री पवन कुमार बंसल यांना उमेदवारी दिली. भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर यांच्याशी त्यांचा मुकाबला आहे.